
मुंबई – देशातील खासगी बँकिंग क्षेत्रातील आघाडीवरची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोच्चर यांना अनिश्चितकालीन सुट्टीवर जाण्याचे आदेश दिले आहेत. व्यावसायिक भागिदारीसाठी चंदा कोच्चर यांच्या पतीने आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेतले होते. करचोरी प्रकरणाचाही आरोप त्यांच्यावर असल्यामुळे हा निर्णय बँकेच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचत असल्याचे मानून घेण्यात आला आहे.
चंदा कोच्चर यांना सुट्टीवर जाण्याचे आदेश!
व्हिडिओकॉन ग्रुपच्या चेअरमन वेणुगोपाल सोबत पती दीपक कोच्चरला व्यावसायिक भागीदारीसाठी कर्ज दिल्याचा आरोप चंदा कोच्चर यांच्यावर आहे. या कर्जवाटपासंबंधीचा खुलासा २०१६ मध्ये ऑडिट दरम्यान झाला होता. २००९ सालापासून आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ पदावर चंदा कोच्चर कार्यरत आहेत. संचालक मंडळ त्यांच्या कामाने खुश होते. पण २०१६ ला झालेल्या गौप्यस्फोटामुळे संचालक मंडळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
बँक संचालक मंडळाच्या सदस्यांचे याप्रकरणी सात सदस्यीय चौकशी मंडळ स्थापन केले होते. चंदा कोच्चर यांना त्यांनीच अनिश्चितकालीन सुट्टीवर जाण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सर्वोच्य न्यायालयाच्या माजी न्यायामूर्तीकडून बँकेच्या वतीने अंतर्गत चौकशी केली जाणार आहे. चंदा कोच्चर यांनी घेतलेल्या निर्णयासंबंधी चौकशी केली जाणार असून यासाठी त्यांना चौकशी सुरू असेपर्यंत पदावर ठेवणे योग्य नसल्याचे मानत सुट्टीवर पाठविण्यात आले आहे.
