हे बंगले आलिशान.. पण उजाड.


एके काळी माणसांची वर्दळ असणाऱ्या भव्य वास्तू..तेथे राहणारे लोक, पाहुणे मंडळींचे आगत-स्वागत, नोकर मंडळींची लगबग ह्यामुळे ह्या वास्तू जिवंत वाटत असत. पण आता ह्यातील काही वास्तू काही कारणाने अगदी उजाड, भकास झाल्या आहेत. पूर्वीसारखी माणसांची वर्दळ इथे नाही. अश्या उजाड वास्तूंशी निगडीत अनेक दंतकथा देखील कालंतराने प्रचलित होतात, आणि मग एक गूढ वलय ह्या वास्तूंच्या भोवती तयार होते. अश्या ह्या वास्तू आणि त्यांच्याशी निगडीत कहाण्यांबद्दल काही रोचक माहिती खास ‘माझा पेपर’च्या वाचकांसाठी.

न्यूयॉर्कच्या थाऊजंड आयलंड्स भागामध्ये असलेली विकऑफ व्हिला ही भव्य, आलिशान वास्तू १८९४ साली विलियम विकऑफ ह्यांनी बंधाविली. त्या काळी अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेली रेमिंग्टन टाईपरायटर्स विकून विलियम विकऑफ ह्यांनी प्रचंड संपत्ती कमविली होती. पण ह्या घरामध्ये राहायला येण्यापूर्वीच विलियम ह्यांच्या पत्नीचा कर्करोगाच्या आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर सुमारे महिन्याभराच्या कालावधीने विलियम ह्या घरामध्ये राहायला आले, आणि त्या घरातील त्यांच्या पहिल्या रात्रीच त्यांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू आला. विकऑफ ह्यांनी बांधविलेली ही अलिशान वास्तू वारसहक्काने त्यांच्या मुलाला मिळाली, पण तो किंवा त्यांच्या परिवारातील इतर कोणीही ह्या वास्तूमध्ये कधीही आले नाहीत. आज साठ वर्षांच्या काळानंतरही ही वास्तू उजाड पडून आहे.

मिलब्रूक, न्यूयॉर्क मधील हॅलसायॉन हॉलचे निर्माण १८९३ साली, येथे पंचतारांकित हॉटेल बनविण्याच्या उद्देशाने केले गेले. पण त्यानंतर १९०७ साली, दोनशे दालने असलेल्या ह्या विशाल वास्तूचे रुपांतर बेनेट महाविद्यालयामध्ये केले गेले. हे कॉलेज महिलांसाठी होते. कालांतराने आर्थिक डबघाईला आल्यामुळे १९७८ साली ह्या कॉलेजने दिवाळखोरी जाहीर केली, आणि त्यानंतर हे कॉलेज बंद झाले. त्याचबरोबर ही इमारतही एकाकी, उजाड झाली. त्यानंतर २०१४ साली ही इमारत आणि त्याच्या अवती भिवती असलेला २७ एकरांचा परिसर एका व्यक्तीने विकत घेतला. ही जुनी इमारत पाडून आणि त्याच्या भोवताली असलेल्या जमिनीची मशागत करून येथे पार्क बनविण्याचा नव्या मालकाचा विचार होता. पण २०१६ सालापर्यंत ही वास्तू जशीच्या तशी उभी होती.

चीनमधील बेजिंग प्रांतामध्ये असलेली ‘शाओने ८१’ ह्या नावाने ओळखली जाणारी वास्तू १९१० मध्ये निर्माण केली गेली. बेजिंमध्ये राहणाऱ्या ब्रिटीश लोकांकरिता चर्च स्थापन करण्यासाठी क्विंग राजवंशाच्या तर्फे ह्या वास्तूचे निर्माण करविण्यात आले होते. १९४९ साली कम्युनिस्ट राजवट आल्यानंतर, येथे राहणाऱ्या, राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आपल्या पत्नीला तिथेच सोडून देऊन, तेथून तायवानला पलायन केले. ह्या घटनेने अतिशय कष्टी झालेल्या त्या स्त्रीने, दुःख सहन न होऊन, त्याच घरामध्ये आत्महत्या केली. तेव्हापासून त्या स्त्रीचा मृतात्मा येथे असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही वास्तू आजतागायत निर्मनुष्य, उजाड पडून आहे.

बेल्जियम देशातील सेलेस येथे असलेली ‘शेटो मिरांडा’ ही देखील अशीच एक भव्य, पण उजाड वास्तू. ह्यालाच ‘शेटो डे न्वाझी’ ह्या नावाने देखील ओळखले जाते. ही भव्य वास्तू १८६६ साली, फ्रेंच उठावानंतर बेल्जियम मध्ये आलेल्या लीडकेर्क बोफोर्ट परीवाराकरिता बांधविण्यात आली होती. दुसरे विश्वयुद्ध झाल्याच्या नंतरच्या काळापर्यंत ही वास्तू ह्याच परिवाराच्या ताब्यात होती. त्यानंतर मात्र बेल्जियमच्या नॅशनल रेल्वे कंपनीने ही वास्तू ताब्यात घेतली. १९८० सालापर्यंत आजारी, अनाथ मुलांचे वसतीगृह म्हणून ह्या वास्तूचा वापर करण्यात येत होता. त्यानंतर मात्र ही वास्तू अगदी निर्मनुष्य झाली. एखाद्या राजवाड्यासम दिसणारी ही वास्तू विकत घेण्याची अनेकांनी तयारी दर्शविली असली तरी ही वास्तू जमीनदोस्त करण्याचा निर्णय गेल्या वर्षी संबंधित मालकांनी घेतल्याचे समजते.

तायवान येथे असलेली ‘लिऊ फॅमिली मॅन्शन’ ही वास्तू शापित आहे अशी येथील स्थानिक रहिवाश्यांची समजूत आहे. त्यामुळेच ह्या वास्तूला ‘मिनीशियॉंग घोस्ट हौस’ असेही म्हटले जाते. ह्या वास्तूचे निर्माण १९२९ साली लिऊ परिवाराने करविले. १९५० सालापर्यंत येथे वास्तव्य करून ह्या परिवाराने अन्यत्र स्थलांतर केले. ह्या वास्तूमध्ये एका सेविकेच्या आत्म्याचा वावर आहे असे ह्या परिवाराचे म्हणणे होते. ह्या सेविकेने ह्या वास्तू जवळील विहिरीमध्ये बुडून आत्महत्या केली होती. तसेच ही वास्तू निर्माण होण्याआधी ह्या ठीकाणी युद्धभूमी असून, तिथे मरण आलेल्या अनेक सैनिकांचे आत्मे ही ह्या वास्तूमध्ये वावरतात असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ही वास्तू उजाड, निर्मनुष्य आहे.

Leave a Comment