
नवी दिल्ली – अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचीही सनफ्रॅन्सिस्कोमध्ये महिनाअखेरी होणा-या अमेरिका दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेणार आहेत. आपल्या विविध उपकरणाचे भारतात उत्पादन सुरू करण्यावर अॅपल विचार करते आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीमुळे मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ योजनेला मोठे बळ मिळणार आहे.
‘अॅपल’च्या सीईओंची मोदी घेणार भेट
भारतात आपल्या विविध उपकरणांचे उत्पादन जर अॅपलने सुरू केले तर त्याचा देशातील उद्योग क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे. परदेशातील वाहन उद्योगातील कंपन्यांनी आतापर्यंत भारतात गुंतवणूक केली आहे. मात्र, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या अजून भारताकडे वळलेल्या नाहीत. त्यातच अॅपलसारखी जगातील सर्वोच्च मानांकीत कंपनी जर भारतात येत असेल, तर जागतिक पातळीवरही त्याचा भारताला फायदाच होणार आहे.
अॅपलकडून सध्या फॉक्सकॉन कंपनीच्या उत्पादन सुविधांचा वापर करण्यात येतो आहे. याच फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे नुकतेच आश्वासन दिले आहे. अमेरिका दौऱ्यावेळी मोदी फेसबुकचा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग याचीही फेसुबकच्या मुख्यालयात भेट घेणार आहेत. त्याचबरोबर गुगलचे नवनियुक्त सीईओ सुंदर पिचाई यांचीही मोदी भेट घेणार आहेत.
