
कोल्हापूर – राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवार यांच्या भेटीला भाजपाचे कोल्हापुरातील नवनिर्वाचित आमदार अमल महाडिक हे आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून अमल महाडिक हे विजयी झाले असून त्यांनी माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांचा पराभव केल्यामुळे जाएंट किलर म्हणून अमल महाडिक यांच्याकडे पाहिले जात आहे.
शरद पवारांच्या भेटीला कोल्हापूरचे नवनिर्वाचित आमदार
काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांचे अमल महाडिक हे सुपुत्र तर राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू आहेत. अमल महाडिक यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महाडिकांच्या एकाच घरात तीन पक्ष आहेत. त्यामुळे भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले अमल महाडिक यांनी राष्ट्रवादीशी जवळीक केल्यास, त्याबाबत कोल्हापूरकरांना आश्चर्य वाटणार नाही. याबाबत स्पष्टीकरण देताना अमल महाडिक यांनी ही भेट सदिच्छा भेट असल्याचे पत्रकारांना सांगितले .
