यावेळेच्या निवडणुकीने केले १६ महिलांना आमदार

vidhansabha
मुंबई – १३व्या विधानसभा निवडणूक महिलांना चांगलीच ठरली असून यावेळी महाराष्ट्रातील १६ महिला उमेदवारांना विजय मिळाला असून यामध्ये १० भाजपच्या तर पाच काँग्रेसच्या महिला आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या एकमेव ज्योती कलानी यांना निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यात यश आले तर शिवसेना आणि मनसेच्या एकाही महिला उमेदवाराला यश मिळाले नाही.

परळी आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपचा गड पंकजा मुंडे आणि माधुरी मिसाळ या दोनही महिला आमदारांनी राखला. तर नवीन महिला उमेदवार मंदा म्हात्रे आणि विद्या ठाकूर या जायंट किलर ठरल्या. यासोबतच भाजपच्या मेधा कुलकर्णी(कोथरुड), भारती लव्हेकर(वर्सोवा), मनिषा चौधरी(दहिसर), स्नेहलता कोथे(कोपरगाव), मोनिका रजाळे(शेवगाव) आणि संगीत ठोंबरे(कैज) या महिला उमेदवार आमदार बनल्या.

काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी पहिल्यांदा नांदेडमधील भोकर विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. तर काँग्रेसच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड(धारावी), यशोमती ठाकूर(तेवसा), निर्मला गावित(इगतपुरी) आणि प्रणिती शिंदे(सोलापूर शहर मध्य) यांनी आपला गड राखला. तर राष्ट्रवादीच्या एकमेव महिला उमेदवार ज्योती कलानी यांनी उल्हासनगर मतदारसंघातून विजय मिळवला. याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाच महिला उमेदवारांना विजय मिळाला होता.