
भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्याचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ आहे आणि या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत सात विधानसभा मतदारसंघ आहेत. या सात पैकी भंडारा, तुमसर आणि साकोली हे तीन मतदारसंघ भंडारा जिल्ह्यात तर अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया आणि आमगाव हे चार मतदारसंघ गोेंदिया जिल्ह्यात आहेत. या सात मतदारसंघांवर भाजपाची छाप आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे निकटचे विश्वासू सहकारी प्रफुल्ल पटेल यांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल पराभूत झाले. भाजपाच्या नाना पटोले यांनी त्यांचा पराभव केला. लोकसभेची निवडणूक जिंकताना त्यांनी तिरोडा वगळता सर्व विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात प्रफुल्ल पटेल यांच्यापेक्षा मोठी आघाडी घेतली. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीचाच दिसण्याची शक्यता आहे.
भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीसमोर प्रश्नचिन्ह
भंडारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघात आता कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजपा यांचे एकेक आमदार आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातले चार पैकी दोन आमदार भाजपचे आणि दोन कॉंग्रेसचे आहेत. भंडारा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात २००९ साली शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर निवडून आले होते. आता पुन्हा ते उभे आहेत. त्यांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार रामचंद्र अवसरे उभे आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि बसपा यांचेही उमेदवार या मतदारसंघात आहेत. विशेष म्हणजे भंडारा आणि गांेंदिया या दोन्ही जिल्ह्यामध्ये मनसेने केवळ भंडारा ही एकच जागा लढवलेली आहे. त्यामुळे भंडार्यातली लढत सहारंगी झाली आहे. तिथे मनसेच्या उमेदवाराचा उपद्रव शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकर यांना होईल आणि त्यांच्या मतविभागणीतून भाजपाचा उमेदवार निवडून येईल अशी शक्यता आहे.
भंडारा तालुक्यातली विधानसभेची दुसरी जागा तुमसर. इथून कॉंग्रेसचे अनिल बावनकर निवडून आले होते. परंतु यावेळी त्यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिलेली नाही. कारण बावनकर हे निष्क्रिय राहिल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे जागा जाऊ नये म्हणून कॉंग्रेसने प्रमोद तितीरमारे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने आता त्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे सदस्य शरण वाघमारे यांना उभे केले आहे. हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणवला जातो आणि भाजपाने हा कॉंग्रेसकडून हिसकावून घेण्यासाठी दंड थोपटलेले आहेत. मतांची समीकरणे भाजपाला अनुकूल आहेत. परंतु त्यामुळेच या पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे. त्यातल्या ज्यांना निराश व्हावे लागले त्यांचा उपद्रव अधिकृत उमेदवाराला झाला नाही तर भाजपाला ही जागा मिळेल.
भाजपाचे आता निवडून आलेले खासदार नाना पटोले हे पूर्वी साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते. त्यांच्या जागेवर आता नवीन उमेदवार द्यावा लागला आणि ही संधी बाळा काशीवार यांना मिळाली. बाळा काशीवार यांच्या व्यतिरिक्त या मतदारसंघात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि बसपा याही पक्षांचे उमेदवार आहेत आणि या पंचरंगी लढतीमध्ये शिवसेनेच्या प्रशांत पडोळे यांच्याशिवाय कोणीही प्रभावी उमेदवार नसल्यामुळे नाना पटोले यांच्या या मतदारसंघात भाजपाची शान राखली जाईल अशी शक्यता आहे.
गोंदिया जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी गोंदिया मतदारसंघात थोड्या नाट्यमय घटना घडत आहेत. या मतदारसंघात कॉंग्रेसचे गोपाळदास अग्रवाल हे प्रदीर्घकाळपासून आमदारपद भोगत आहेत आणि याही वेळी त्यांना तिकिट मिळाले आहे. गोंदिया हा प्रफुल्ल पटेल यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. पण या मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला ६ हजार मते कमी पडली. परिणामी, गोपाळदास अग्रवाल यांचे तिकिट कापावे आणि नवा उमेदवार द्यावा अशा मागणीचा उठाव पक्षात झाला. तरीही शेवटी अग्रवाल यांनी बाजी मारली आणि उमेदवारी मिळवलीच. त्यांना यावेळी भाजपाचे विनोद अग्रवाल हे आव्हान देत आहेत आणि या दोघातली लढत अटीतटीची होणार आहे. कॉंग्रेसचा हा विधानसभा मतदारसंघ खेचून घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.
गोंेदिया जिल्ह्यातला कॉंग्रेसच्या हातात असलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे आमगाव (राखीव). या मतदारसंघात २००९ साली कॉंग्रेसचे रामरतनबापू राऊत हे निवडून आले होते आणि याही वेळी त्यांना उभे करण्यात आले आहे. आमगाव आणि गोंदिया दोन्ही मतदारसंघात उमेदवारीवरून कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. त्याचा फटका कॉंग्रेसला बसेल कारण काही नाराज कॉंग्रेसजनांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. या सर्व मतदारसंघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि बसपा अशा तिघांमध्ये मतविभागणी होत आहे तर दुसर्या बाजूला शिवसेना आणि भाजपामध्ये मतविभागणी होत आहे. तिचे स्वरूप कसे राहील यावर कोण निवडून येणार हे ठरणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव हे दोन मतदारसंघ भाजपाच्या हातात होते. त्यातील अर्जुनी मोरगावचे विद्यमान आमदार राजकुमार बडोले यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. परंतु तिरेाडा येथील आमदार खुशाल बोपचे यांना विश्रांती देऊन त्यांच्याजागी विजय रहांगडाले यांना संधी दिली आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपाचे वर्चस्व असल्याचे मानले जाते. अर्जुनी मोरगावमध्ये बसपा उमेदवार आहे. तिरोड्यात तो नाही. मात्र अन्य उमेदवार फारसे प्रभावी नसल्यामुळे भाजपाला या दोन्ही जागा राखता येतील अशी शक्यता आहे.
