आता भाड्यानेही मिळणार नॅनो

nano
दिल्ली – कार्स ऑन रेंट या कार भाड्याने देणार्‍या कंपनीने टाटा मोटर्स बरोबर केलेल्या सहकार्य करारानुसार आता नॅनो कार भाड्यानेही दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे नॅनो भाड्याने घेऊन स्वतःच चालवायची आहे. त्यासाठी दिवसाला ग्राहकाला फक्त ३९९ रूपये भाडे भरावे लागणार आहे. माइल्स सिटी टूर ड्राईव्ह या योजनेअंतर्गत ही सोय उपलब्ध करून दिली गेली असून टाटा मोटर्स तर्फे सुरवातीला २०० नॅनो कारझोननेट कंपनीला दिल्या जाणार आहेत.

कार्स ऑन रेंटचे सीईओ राजीव विज म्हणाले टाटा मोटर्सबरोबर नॅनो भाड्याने देण्यासंदर्भात केलेला करार कंपनीच्या दीर्घकालीन सहकार्य कराराच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. सध्या ही योजना दिल्ली आणि एनसीआर पुरती मर्यादित असून तासाला ९९ रूपये भाडे आकारूही नॅनो भाड्याने दिली जाणार आहे. ग्राहकाला महिनाभरासाठी नॅनो हवी असेल तर ६९९९ रूपये भरावे लागतील. कंपनीची दिल्लीत ४३ केंद्रे आहेत तेथे सर्वत्र ही सेवा दिली जाईल व गाडी भाड्याने घेण्यासाठी ऑनलाईन बुकींगही करता येणार आहे.

टाटा मोटर्सचे अधिकारी दीपांकर तिवारी म्हणाले या योजनेमुळे आम्ही मोठ्या संख्येने ग्राहकांपर्यंत पोहोचू शकणार आहोत तसेच नॅनोचा सेल्फ ड्राईव्ह अनुभव ग्राहकाला आपोआपच मिळणार आहे.

Leave a Comment