
मुंबई – आता लोकसभेची जागा दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची दुसरी कन्या लढणार असून मुंडेच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर त्यांच्या कुटुंबाचाच हक्क आहे, असे म्हणणाऱ्या आमदार पंकजा मुंडे पालवेंनी अखेर विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंडेंची दुसरी कन्या लढविणार लोकसभेची जागा
ही जागा मुंडेंच्या मृत्यूनंतर आमदार पंकजा मुंडे पालवे लढवणार असल्याची शक्यता व्यक्त वर्तविली जात होती. त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याचेही संकेत मिळाले होते. पण, अखेर त्यांनी विधानसभाच लढण्याचे ठरवले असून त्यांची धाकटी बहिण डॉ.प्रीतम मुंडे खाडे या लोकसभा लढणार आहेत.
विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी पंकजा या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात असे विधान केले होते. यानंतर, पंकजा मुंडे यांनीही आपण परळी विधानसभा मतदार संघातून अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पंकजा आज आपला अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.
तर, मुंडे यांच्या अपघाती मृत्यूने रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी पंकजा यांची लहान बहिण आणि गोपीनाथ मुंडे यांची द्वितीय कन्या डॉ. प्रीतम मुंडे खाडे अर्ज दाखल करणार आहे. प्रीतम २६ तारखेला पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
या पोटनिवडणुकीसाठी बीडमध्ये विधानसभा मतदानाच्या दिवशीच म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुंडे यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादीचा कोणताही उमेदवार दिला जाणार नाही, असे जाहीर केले आहे.
