नवरात्रौत्सवासाठी सज्ज महालक्ष्मी मंदिर प्रशासन

mahalaxmi
कोल्हापूर – नवरात्रौत्सवासाठी आता देशातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या करवीरनगरी सज्ज झाली असून नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर महालक्ष्मी मंदीरही सध्या विद्युत रोषणाईने न्हावून निघाले आहे.

मंदीराचा संपुर्ण परिसर अत्याधुनिक विद्युत रोषणाईमुळे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. तसेच ही रोषणाई पाहण्यासाठी भाविक, भक्तांचीही गर्दी होत असून, भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. त्याशिवाय मंदिरातील इतर सर्व तयारीही पूर्ण झाली आहे.

देशभरातील भाविकांसाठीचे आकर्षणाचे केंद्र म्हणजे कोल्हापूरच्या अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव आणि शाही दसरा आहे. मंदीरात केलेल्या तयारी अंतर्गत यंदा महिला भाविकांच्या सोयीसाठी भवानी मंडपात, तर पूर्व दरवाजा येथे महालक्ष्मी भक्तमंडळाच्यावतीने मंडप उभारण्यात आला आहे.

तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिरात नव्याने १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची एकूण संख्या २८ झाली आहे. त्याशिवाय दरवाजांवरील डोअर मेटल डिटेक्‍टरही दोन ठिकाणी बसविण्यात आले आहेत.

नवरात्रोत्सवात महालक्ष्मी मंदिरात संगीतोत्सवही रंगणार आहे. पुणे, कराडसह स्थानिक भजनी मंडळी संगीताच्या माध्यमातून देवीची सेवा करणार आहेत. त्याशिवाय कोल्हापुरातील कलाकारांनाही संधी देण्यात येणार आहे. सोंगी भजन, भजनी मंडळ, भरतनाट्यम्‌, भावगीते, भक्तिगीते अशा विविध गाण्यांचा या महोत्सवात समावेश असणार आहे.

Leave a Comment