बेशरम रंगवर बिलावल भुट्टोने धरला ठेका? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य


अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा ‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. त्यांच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून बराच वाद झाला होता. आता या गाण्यावरील एका जोडप्याच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही लोकांचा दावा आहे की व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनीही बिलावल भुट्टो यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. पण आम्ही तुम्हाला सांगतो की हे खरे नाही. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे हा बिलावल भुट्टोसारखा दिसणारा व्यक्ती?


पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांनी ट्विटरवर या व्यक्तीला बिलावल भुट्टो म्हटले तेव्हा हा गोंधळ आणखी वाढला. त्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जे चांगले करू शकतात ते करत आहेत’ मात्र, जेव्हा तारेक फतेहला सत्य समजले तेव्हा त्यांनी त्यांचे ट्विट डिलीट केले. हा व्हिडिओ पहिल्यांदा इनाया खान नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यामध्ये बिलावलसारखी दिसणारी व्यक्ती मेहरोज बेग आहे, जो कराचीमध्ये मीडिया सायन्सचा अभ्यास करतो. इनायाच्या कॅप्शननुसार, हा व्हिडिओ तिच्या बहिणीच्या लग्नाच्या फंक्शन दरम्यान बनवला होता.

ट्विटरवर हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी मेहरोजला बिलावल भुट्टो समजून त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली. प्रवीण उनियाल नावाच्या युजरने ट्विट केले की, “पाकिस्तान बिलावल भुट्टो सारख्या नेत्यांच्या सुरक्षित हातात आहे…त्यांना काश्मीर हवे आहे.” त्याचप्रमाणे अनेक युजर्सनी संभ्रमात बिलावलचा पाय ओढायला सुरुवात केली.