शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; ट्विटर युजर विरोधात गुन्हा दाखल


मुंबई – ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या निखील भामरे या ट्विटर युजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे दाखल करण्यात आला आहे.

आनंद परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आपल्या ट्विटर अकाऊंटवरून निखील भामरे या व्यक्तिने शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त मजकूर ट्विट केला आहे. वेळ आली आहे बारामतीच्या “गांधी”साठी… बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटनुसार शरद पवार यांना मारण्याचा आणि समाजात अशांतता निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार धमकी तसेच चिथावणी दिल्याप्रकरणी हा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी रिट्विट करत भामरे याचे ट्विट विकृत माणसावर कठोर कारवाई करा असे म्हटले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली.