इम्रान खान यांनी स्वत:चीच केली गाढवाशी तुलना


इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या त्यांच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. त्यात त्यांनी स्वतःचीच खिल्ली उडवली आहे. त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान स्वत:चीच तुलना गाढवाशी केली आहे. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटकरीही त्यांची खिल्ली उडवत आहेत.


इम्रान खान पाकिस्तान आणि राजकारणावर द सेंट्रम मीडिया नावाच्या यूट्यूब चॅनलच्या शो दरम्यान बोलत होते. त्यांना यावेळी होस्टने ‘पाकिस्तानी लोक देश सोडून का जातात?’ असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना इम्रान यांनी स्वतःचे उदाहरण देत सांगितले की, मी सुद्धा २०-३० वर्षे बाहेर होतो, क्रिकेट खेळायचो, पण मला मी त्यांच्यातला कधीच वाटलो नाही, मी त्या समाजाचा एक भाग होतो आणि त्यांनी मला मनापासून स्वीकारले होते. ब्रिटीश समाजात अशा प्रकारे स्वीकारणारे फार कमी लोक आहेत. पण एवढे होऊनही ते घर मी कधीच मानले नाही, कारण मी पाकिस्तानी होतो.

इम्रान खान एवढ्यावरच थांबले नाहीत, पुढे ते म्हणाले की, जे मला हवे होते, तेच मी करत होतो, कारण मला माहिती होते, मी इंग्रज होऊ शकत नाही. तुम्ही जर गाढवावर पट्टे ओढले, तर गाढवाचा झेब्रा होऊ शकत नाही. शेवटी गाढव ते गाढवच राहील, असे म्हणत त्यांनी स्वतःची तुलना गाढवाशी केली. इम्रान खान यांचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेक जण याबर मीम्स बनवताना दिसत आहेत.