मनसे सोडल्याच्या चर्चेमुळे वसंत मोरे नाराज


पुणे – राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील लाऊड स्पीकर बंद करण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून राज्यातील राजकारण लाऊड स्पीकरवरून तापल्याचे पाहायला मिळत आहे. दुसऱ्या पक्षांकडूनच नाही, तर त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंच्या या भूमिकेला विरोध झाल्याचे पाहायला मिळाले.

अनेक कार्यकर्त्यांनी विरोध करत पक्ष सोडले, तर काहींनी उघड नाराजी व्यक्त केल्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले. पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे हे देखील त्यापैकीच एक असून पुणे मनसे अध्यक्ष पदावरून वसंत मोरेंना हटवल्यानंतर ते पक्ष सोडणार अशी चर्चा होती. परंतु नंतर ठाण्याच्या सभेत वसंत मोरे हजर राहिले आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला.

दरम्यान, मुस्लिम समाजाला लाऊड स्पीकर काढण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन केले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी 3 मे रोजी यासंदर्भात आंदोलनही केले होते. पण मनसेचे कट्टर समर्थक असलेले वसंत मोरे हे मात्र या सर्व गोष्टींपासून दूर असल्याचे पाहायला मिळाले होते. ज्यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून 4 मे रोजी आरती करण्यात आली, त्यावेळी वसंत मोरे हे बालाजीच्या दर्शनाला गेले होते. त्यानंतर त्यांच्याकडून आज कात्रज येथील हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष सोडण्याबद्दलच्या चर्चांवर वसंत मोरेंनी प्रतिक्रिया दिली.

गेल्या महिन्याभरापासून मी आजारी आहे, मी पक्ष सोडणार, अशा चर्चा सुरू आहेत. पण असे काहीच नाही. माझ्या पक्ष सोडण्याबाबत पक्षातील काही असंतुष्ट आत्मे सतत अफवा पसरवत आहे. त्यांना मी सांगू इच्छितो की मी पक्षातच आहे आणि अशा लोकांपासून पक्षाला धोका असल्याचे आपण राज ठाकरे यांच्या कानावर घातले असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.