काबुल – उपासमारी आणि आर्थिक विंवचनेत असलेल्या अफगाणिस्तानमधील महिलांसाठी तालिबानने नवा फतवा जारी केला आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या महिलांना डोक्यापासून पायापर्यंत बुरखा घालण्याचा फतवा काढण्यात आला आहे. त्याचबरोबर या बुरख्यातून महिलांचे डोळेही दिसता कामा नये, असे फतव्यात म्हटले आहे.
अफगाणी महिलांसाठी तालिबानचा नवा फतवा
डोक्यापासून पायापर्यंत महिलांनी बुरखा घालणे आवश्यक आहे. कारण ते पारंपारिक आणि आदरणीय असल्याचे तालिबान प्रमुख हिबतुल्ला अखुंदजादा यांनी म्हटले आहे. कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यापासून महिलांवर लादण्यात आलेल्या नियमांपैकी हा सर्वात कठोर नियम आहे.
त्याचबरोबर तालिबानने काही दिवसांपूर्वीच महिलांना वाहन परवाना देण्यावरही बंदी घातली आहे. अफगाणिस्तानातील सर्वात प्रगतीशील शहर हेरातमधील अधिकाऱ्यांना महिलांना वाहन परवाने देण्यास मनाई केली आहे.
तालिबानने गेल्यावर्षी अफगाणिस्तानमधील मुलींच्या माध्यमिक शाळा पुन्हा उघडल्यानंतर काही तासांनी बंद करण्याचे आदेश दिले होते. अनेक मुली आणि महिलांनी या आदेशाला विरोध दर्शवला होता. शाळा पुन्हा सुरु करण्यात यावी, यासाठी तालिबानविरोधात निर्देर्शनही करण्यात आले होते. तसेच महिलांच्या स्वतंत्र विमान प्रवासावर देखील तालिबानने बंदी आणली आहे. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास त्या पुरुषांशिवाय करू शकणार नसल्याचाही फतवा काढण्यात आला होता.