माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पगार राज्य सरकारने थांबवला


मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पगार राज्य सरकारने थांबवला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारकडून परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याचीही तयारी सुरु झाली आहे. मुंबई, ठाणेसह अनेक ठिकाणी परमबीर सिंहांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. परमबीर सिंह यांना राज्य सरकार कायदेशीर प्रक्रियेनंतर फरार घोषित करणार आहेत. परमबीर सिंह यांच्यासह 25 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निवेदन पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला दिले आहे. पण प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असलेल्या आरोप विस्तृत स्वरूपात देण्यास पोलीस महासंचालकांना गृह विभागाने सांगितले आहे.

राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यानंतर आता परमबीर सिंह आणि इतर पोलिस अधिकारी ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांना निलंबित करण्याचे निवेदन पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला दिला आहे. पण सावध भूमिका घेत अधिकाऱ्यांवर असलेल्या आरोपांची विस्तृत माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून गृह विभागाने मागवली आहे.. किती गंभीर स्वरूपाचे आरोप संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आहेत, याची माहिती गृह विभागाला हवी आहे, ज्या नंतर यावर त्यांच्याकडून निर्णय घेण्यात येईल.

ज्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत, अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निवेदन गृह विभागाला पाठवण्यात आले आहे. या निवेदनात परमबीर सिंह यांच्या सुद्धा नावाचा समावेश आहे. त्याचबरोबर 4 पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची नावे आहेत. गृह विभागाकडून मिळालेल्या सूचनांनुसार पुन्हा महासंचालक कार्यालयाकडून यासंदर्भात नव्याने निवेदन तयार करण्यात येणार असून लवकरच पुन्हा गृह विभागाकडे या अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी हे निवेदन पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.