इलेक्ट्रिक स्कूटरच्या टेस्टिंगला होंडाने केली सुरुवात


नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांकडे गेल्या अनेक महिन्यांपासून असलेला भारतीयांचा कल वाढताना दिसत आहे. कार असो वा स्कूटर असो इलेक्ट्रिक प्रकारामधील वाहनांची विक्री वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक मोठ्या दुचाकी कंपन्या आगामी काळात भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईक लाँच करणार आहेत. त्यातच आता जपानची दिग्गज कंपनी होंडा देखील लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर Activa असू शकते, असे सांगितले जात आहे.

भारतात सर्वाधिक विक्री होणारी होंडा अॅक्टिव्हा आता नवीन इलेक्ट्रिक रुपात म्हणजे होंडा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक म्हणून लाँच करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती कंपनीकडून मिळालेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतामध्ये आता होंडाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या टेस्टिंगलाही सुरूवात झाल्याचे सांगितले जात आहे.

पुढील वर्षी भारतात होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर करण्याच्या प्रयत्नात आहे. होंडाची लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर BENLY इलेक्ट्रिक स्कूटर अलीकडेच भारतीय रस्त्यांवर दिसली होती. पण, बॅटरी आणि रेंजची टेस्टिंग झाल्यानंतर कंपनी आपली बेस्ट सेलिंग अॅक्टिव्हा स्कूटरलाच होंडा अॅक्टिव्हा ईव्ही स्वरुपात सादर करण्याचीही दाट शक्यता असल्याची चर्चा आहे. आताच्या घडीला होंडा कंपनी इलेक्ट्रिक दुचाकींच्या बाजाराचे मूल्यांकन करत आहे. २०२४ पर्यंत जागतिक स्तरावर होंडा कंपनी किमान ३ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. पण यापैकी किती मॉडल्स भारतात लाँच होतील, याबाबत अधिक स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.