देवेंद्र फडणवीसांची सरकारवर समीर वानखेडेंवरील आरोपांवरून टीका


मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून आधी आर्यन खानची अटक आणि त्यानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप या मुद्द्यांवरून मोठा वाद आणि चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे. आज खुद्द समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्प्टष्ट केली, तर आज मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. या मुद्द्यावरून आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

समीर वानखेडे यांच्यावर आणि २ ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकण्याच्या एनसीबीच्या कारवाईवर नवाब मलिक सातत्याने गंभीर आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. नवाब मलिक यांचे दु:ख वेगळे आहे. पण अशा प्रकारे एखाद्या तपास अधिकाऱ्याला टार्गेट करणे योग्य नाही. ते संवैधानिक पदावर आहेत. रोज आरोप लावायचे, आपल्या सरकारवर दबाव टाकून साक्षीदारांना वादाच्या भोवऱ्यात टाकायचे. हे अयोग्य आहे. साक्षीदारांची विश्वासार्हता न्यायायलयाबाहेर समाप्त करण्याचा प्रयत्न झाला, तर कुठलीच केस टिकणार नसल्याचे ते म्हणाले.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या धर्माविषयी आक्षेप घेतल्यानंतर त्या मुद्द्यावरून देखील फडणवीसांनी आक्षेप घेतला आहे. कारवाई करतो म्हणून एखादा तपास अधिकाऱ्याची जात-धर्म काढायचा हे दुर्दैवी आहे. शेवटी वानखेडेंच्या पत्नीला खुलासा करावा लागला. वानखेडे चुकले असतील, तर त्याची चौकशी झाली पाहिजे हे मान्य आहे. पण हेतुपरस्सर अधिकाऱ्याला टार्गेट करणे मान्य नाही. या प्रकरणात आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे एनसीबीच्या वरिष्ठांशी त्याची चौकशी करायला हवी, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकार विशिष्ट कारणासाठी आर्यन खान, समीर वानखेडे यांच्याबाबत वाद वाढवत असल्याचा दावा फडणवीसांनी केला. त्यांची राज्यात एवढी प्रकरणे सुरू आहेत आणि एवढ्या प्रकरणांमध्ये ते फसले आहेत, की त्यावरून त्यांना राज्याचे लक्ष हटवायचे आहे. म्हणून महाराष्ट्र सरकार हा वाद वाढवत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.

राज्यात १ हजार कोटींच्या दलालीवर तोंडं बंद का आहेत? १९० कोटींची कमाई सापडली, त्यावर तोंडे बंद का आहेत? सॉफ्टवेअरने वसुली सुरू आहेत, त्यावर तोंडे बंद का आहेत? न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने तपास केल्यानंतर गृहमंत्री फरार आहेत. त्यावर तोंडे बंद का आहेत? असा सवाल देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला. संजय राऊत एकदा तरी शेतकऱ्यांवर बोलले का? नवाब मलिक बोलले का? यांना हे माहिती आहे की त्यावर बोलले की हे फसतील. पण कितीही प्रयत्न केला, तरी हा प्रश्न येईलच की दलालीचे काय झाले? असे देखील ते म्हणाले. जे छापे पडले आहेत, त्यातून जी माहिती बाहेर यायला लागली आहे, यातून हे खरच महावसुली सरकार असल्याचा संदेश लोकांमध्ये जात आहे. त्यावर लोकांचा पूर्ण विश्वास बसू लागला आहे.