विकी कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज


अभिनेता विकी कौशलने अगदी अल्पावधीतच आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो लवकरच ‘सरदार उधम’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. दोन दिवसांपूर्वी या चित्रपटचा टीझर विकीने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

सरदार उधम सिंग हे एक महान स्वातंत्र्य सैनिक होते. हा चित्रपट त्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांनी हाती घेतलेल्या ऑपरेशनची झलक या ट्रेलरमध्ये बघायला मिळते. ट्रेलरच्या सुरूवातीला कागदपत्र दाखवण्यात आली आहेत. त्यात अनेक पासपोर्ट दिसत आहेत. पुढे खोटी ओळख पत्र बनवून सरदार उधम सिंग हे इंग्लंडमध्ये जातात, त्यांच्या टार्गेटचा पाठलाग करतात. दरम्यान अनेक संकटांचा सामना त्यांना करावा लागतो. 16 ऑक्टोबर रोजी ही रोमांचक कथा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘सरदार उधम’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. शूजित सिरकार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर राइजिंग सन फिल्म्सने किनो वर्क्सच्या सहकार्याने या अॅमेझॉन ओरिजिनल मूव्हीची निर्मिती केली आहे. हा ट्रेलर विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत, सरदार उधम ऑफिशियल ट्रेलर,एक अशा माणसाची कथा ज्याला आपण कधीच विसरू शकत नाही. यांच्या प्रवासाची कथा अतुलनीय आहे. ही गोष्ट आहे एका क्रांतिकारकाची, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.