भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता


अलिबाग – भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाली आहे. अलिबाग येथे हे महाविद्यालय यावर्षीपासूनच सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, पोलीस अधिक्षक अशोक दुधे, जिल्हा शल्यचिकीत्सक सुहास माने आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता गिरीश ठाकूर यावेळी उपस्थित होते.

३१ जानेवारी २०१२ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने अलिबाग येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यात भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेच्या आधिन राहून मंजुरी दिली होती. पण नंतर जागे अभावी हा प्रस्ताव लालफीतीत अडकला होता. २०२० पर्यंत याबाबत कुठलीही हालचाल झाली नव्हती. आता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने तब्बल नऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे. १०० विद्यार्थी क्षमतेचे हे महाविद्यालय यावर्षीपासूनच सुरु होणार आहे.

पुढील तीन वर्षासाठी महाविद्यालयासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाने सलग्न करण्यात आले आहे. महाविद्यालयासाठी आरसीएफ कॉलनी कुरुळ येथील माध्यमिक शाळेची जुनी इमारत इतर सहा इमारती असा सहा एकरचा परिसर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयात लेक्चर हॉल आणि ग्रंथालय उभारणीचे काम सुरु करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या नविन इमारत बांधकामासाठी उसर येथील ५३ एकरचा भुखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावर ४०६ कोटींच्या खर्चून नवीन इमारत बांधली जाणार आहे. त्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. महाविद्यालयासाठी चार वर्षात १ हजार ०७२ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आल्याचे यावेळी तटकरे यांनी सांगीतले.

राज्य सरकारने गेल्या आठ महिन्यात वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक सर्व बाबांची पुर्तता केल्यानंतर भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे मान्यतेसाठी अर्ज करण्यात आला होता. आयुर्विज्ञान परिषदेच्या पथकाने गेल्या महिन्यात अलिबाग येथे येऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे रायगडकरांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पुर्ण होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या महाविद्यालयामुळे रायगडच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळेल. कोकणातील विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान अलिबागच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निवड करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.