२७ वर्षीय महिलेला शाळकरी मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा


हैदराबाद – एका २७ वर्षीय महिलेला हैदराबादमधील एका लहान मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. एका शाळकरी मुलावर या महिलेने शाळेमध्येच लैंगिक अत्याचार केले होते. बलात्कार आणि लहान मुलांना संरक्षण देणाऱ्या पॉक्‍सो कायद्याअंतर्गत या प्रकरणामध्ये सुनावणी झाली. विशेष न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीत या महिलेला २० वर्षांच्या तुरुंगवासाची सिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच तिला २० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

ज्योति उर्फ मंजुळा असे आरोपी महिलेचे नाव आहे. हा मुलगा ज्या शाळेमध्ये शिकतो, तिथेच ही महिला केअरटेकर म्हणजेच मुलांची काळजी घेणारी महिला शिपाई म्हणून काम करायची. डिसेंबर २०१७ रोजी या प्रकरणामध्ये चंद्रयानगुट्टा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा मुलाच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर दाखल करुन घेण्यात आला होता. पॉक्सोसोबतच आयपीसीअंतर्गत येणाऱ्या काही गंभीर कलमांअंतर्गत पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला होता.

मुलाच्या वडिलांनी आपल्या तक्रारीमध्ये दिलेल्या माहितीनुसार मुलाच्या शरीरावर चटक्यांचे व्रण दिसून आल्यानंतर हा प्रकार उघढकीस आला. यासंदर्भात आपण मुलाकडे चौकशी केली असता शाळेतील केअरटेकर आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करते, असे मुलाने सांगितल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. ही महिला नुकतीच शाळेत कामाला लागली होती आणि नेहमीच ती आपल्यासोबत अशी वर्तवणूक करते, असे या मुलाने त्याच्या वडिलांना सांगितले. या महिलेने मुलाला घडलेल्या प्रकारासंदर्भात कुठेही वाच्यता करायची नाही. या बद्दल कुठेही बोललास तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या महिलेने एवढ्यावरच न थांबता मुलाला सिगारेटचे चटकेही दिल्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे. पण हा मुलगा घडलेला प्रकार पालकांना सांगण्यापासून घाबरत होता.

ही महिला नंतर या मुलाचे लैंगिक शोषण करु लागली. या मुलासोबत तिने अनेकदा लैंगिक चाळे करुन त्याचे शोषण केल्याचे न्यायालयाला पोलिसांनी सांगितले. अत्याचार केल्यानंतर ही महिला या मुलाला धमकावत असल्यामुळे त्याने त्याच्या वडिलांचे लक्ष अंगावरील चट्ट्यांकडे जाईपर्यंत काहीच आपल्या घरी सांगितले नव्हते. पब्लिक प्रॉसिक्युटर आयशा रफात यांनी या प्रकरणामध्ये न्यायालयासमोर पीडित मुलाची बाजू सविस्तरपणे मांडली. या प्रकरणामधील आरोपपत्र आणि घडलेला घटनाक्रम ऐकून घेतल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने निकालामध्ये या महिलेला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावतानाच २० हजारांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मुलांच्या शाळेतील सुरक्षेसंदर्भातील मुद्दा चर्चेत आला आहे.