सचिन वाझेंचा ईडीकडे खुलासा; अनिल देशमुखांनी शरद पवारांना राजी करण्यासाठी मागितले होते २ कोटी !


मुंबई – अनिल देशमुखांनी शरद पवारांना राजी करण्यासाठी २ कोटी मागितल्याचा खुलासा सचिन वाझेने ईडीकडे केला आहे. वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करवून घेण्यास शरद पवारांनी विरोध केला होता. अनिल देशमुखांनी यावर पवारांना राजी करण्यासाठी पैसे मागितले होते. सचिन वाझेला शरद पवारांना मनवण्यासाठी २ कोटी रुपये खर्च करण्यास अनिल देशमुख यांनी सांगितले होते. वाझेने पैसे भरण्यास असमर्थता दाखवल्यानंतर देशमुखांनी ते वेळेवर देण्यास सांगितले होते, असा दावा वाझेने केला आहे.

पुढे सचिन वाझे म्हणाले की, तत्कालीन पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी जुलै २०२० मध्ये १० पोलीस उपायुक्तांच्या (डीसीपी) बदली आणि नियुक्तीचे आदेश जारी केले होते. या आदेशांवर मंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब खूश नसल्यामुळे त्यांनी आदेश माघारी घेतला होता. तीन ते चार दिवसांनंतर मला कळले की हा आदेश पैसे आणि इतर काही तडजोडींनंतर जारी करण्यात आला होता. या पोलीस अधिकाऱ्यांकडून एकूण ४० कोटी रुपये घेण्यात आले होते. त्यापैकी २० कोटी रुपये संजीव पलांडे यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना तर, २० कोटी आरटीओ अधिकारी बजरंग करमाटे यांच्यामार्फत अनिल परब यांना देण्यात आले होते.

सचिन वाझेला त्यांच्या कार्यालय, घरी, राज्य अतिथीगृहात अनिल देशमुख बोलावून विविध प्रकरणांच्या संदर्भात थेट निर्देश किंवा सूचना देत असत. सोशल मीडिया बनावट फॉलोअर केस सारख्या काही प्रकरणांमध्ये तर अनिल देशमुख स्वतःच निर्देश द्यायचे, असेही वाझेनी सांगितले. प्रत्येक बारमालकाकडून ३ लाख रुपये गोळा करण्याचे अनिल देशमुख यांनी आदेश देत १७५० बार आणि रेस्टॉरंटची यादी देण्यात आल्याचेही वाझेने सांगितले. डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान वाझेने ४.७ कोटी रुपये गोळा केले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात अनिल देशमुख यांनी मला त्यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून माझ्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर फोन केला आणि मला आजपर्यंत गोळा केलेली रक्कम कुंदन शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्याच्या सूचना दिल्या.