५ सप्टेंबर रोजी तिसऱ्या लाटेबाबत टास्क फोर्सची ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद


मुंबई – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार अनेकविविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद कोविड राज्य कृती दलाने आयोजित केली आहे. या परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार, असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख देखील उपस्थित राहणार आहेत.

सोशल मीडियावरुन रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणारी परिषद प्रसारित केली जाणार आहे. राज्यातील सर्व फॅमिली डॉक्टर्स, वैद्यकीय तज्ञ तसेच नागरिकांनाही परिषदेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे. या परिषदेतील चर्चेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शंका, तसेच घ्यावयाची काळजी अशा विविध बाबींची माहिती घेता येणार आहे. या परिषदेसाठी www.facebook.com/onemdhealth यावर प्रश्न पाठवता येतील.

कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ राहूल पंडित, डॉ शशांक जोशी, डॉ. अजित देसाई मुलांसाठीच्या राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ सुहास प्रभू, तसेच अमेरिकेतील डॉ मेहुल मेहता या परिषदेत सहभागी होणार आहेत. परिषदेत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास उपस्थित राहणार आहेत.