छगन भुजबळांच्या संपत्तीची माहिती शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी द्यावी, किरीट सोमय्यांचे आव्हान


नाशिक – ज्या नऊ मजली इमारतीत छगन भुजबळ राहतात, त्या इमारतीशी भुजबळांचा काय संबंध हे स्पष्ट करावे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. ज्या महालात तुम्ही तुमच्या परिवारासोबत राहता, तो महाल उभारण्यासाठी तुमच्याकडे पैसा कुठून आला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर भुजबळांच्या संपत्तीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी द्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, या नऊ मजली महालाचा मालक कागदावर परवेझ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आहे. आपला परवेझ कन्स्ट्रक्शनशी संबंध काय? त्यांना तुम्ही भाडे देता की त्यांच्याकडून विकत घेतला आहे? त्याचबरोबर त्यांनी परवेझ कंपनीसोबतच इतरही काही कंपन्यांची नावे घेतली आणि या कंपन्या बोगस असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

ईडीने ह्या कंपन्या चालवणाऱ्या लोकांना अटक केली होती, त्यांचे स्टेटमेंट आयकर विभागाने घेतल्यावर त्यांनी सांगितले की, आम्हाला भुजबळांनी रोख पैसे दिले, ते आम्ही या कंपन्यांमध्ये टाकले, असे किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या परिवारासोबत ज्या घरात छगन भुजबळ राहतात, ती इमारतही बेनामी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

यावेळी छगन भुजबळ यांची मालेगाव, खारदांडा, पनवेल या ठिकाणी प्रचंड प्रमाणात बेनामी संपत्ती असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या संपत्तीपैकी एका ठिकाणी भेट दिल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शनिवारी आपण भुजबळांच्या राहत्या घरी भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.