सहायक आयुक्त कल्पिता पिंपळेंच्या भेटीला राज ठाकरे; म्हणाले तुम्ही लवकर बऱ्या व्हा


ठाणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ला झाल्यानंतर आज उपचार घेत असणाऱ्या पिंपळे यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. राज यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये दुपारी एकच्या सुमारास जाऊन पिंपळे यांची भेट घेतली. राज यांच्यासोबत यावेळी त्यांचे पुत्र अमित ठाकरे, मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष शेलार, मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई इतर पदाधिकारीही उपस्थित होते. राज यांनी या भेटीनंतर रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. पण पिंपळे यांना भेटीदरम्यान राज यांनी एका वाक्यामध्ये अगदी मोजक्या शब्दा धीर दिल्याचे समजते.


आश्वासन वगैरे काही मी दिलेले नाही. मी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आलो होतो. लवकर बरे व्हा एवढेच सांगितले असल्याचे राज ठाकरे यांनी पत्रकारांशी या भेटीनंतर बोलताना सांगितले. तसेच फेरीवाल्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता राज यांनी, अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आमचे आंदोलन असते. मी काल जे म्हटले त्याप्रमाणे, जे काही घडले त्याचे दु:ख निश्चितच आहे. पण काळही सोकावतो. अशा प्रकारची हिंमत ठेचणे गरजेचे आहे. पोलीस त्यांची कारवाई करतच असल्याचे राज म्हणाले. तसेच पुढे बोलताना, न्यायालय देखील त्यांचे काम करेल अशी आमची पूर्ण अपेक्षा आणि आशा असल्याचेही राज यांनी म्हटले आहे. तसेच आपण कार्यकर्त्यांची भेट घेणार नसून मुंबईला परतणार असल्याचेही राज यांनी यावेळी स्पष्ट केले. राज यांनी पिंपळे यांची भेट घेतली तेव्हा, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. बाकी फेरीवाल्यांचे काय ते आम्ही बघू, अशा शब्दात या महिला अधिकाऱ्याला धीर दिला. यासंदर्भातील व्हिडीओही प्रसारमाध्यमांनी दाखवला आहे.

राज ठाकरे यांना याचसंदर्भात काल पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला असता, त्यांनी या फेरीवाल्याला मनसे सोडणार नसल्याचा इशारा होता. जेव्हा तो पोलिसांकडून सुटेल, तेव्हा तो आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. ह्यांची जेव्हा सगळी बोटे छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा त्यांना कळेल. यांची हिंमत होतेच कशी. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो, याने काही सुधारणारे लोक नाहीत. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. सरकारी अधिकाऱ्याची बोटे छाटता? आज अटक झाली आहे, उद्या जामीन मिळेल. परत दुसऱ्याची बोटे तोडायला बाहेर येतील, असे राज म्हणाले आहेत.