गेल्या महिन्यात सरकारी तिजोरीत जीएसटीच्या रुपात जमा झाले १.१२ लाख कोटी रुपये


नवी दिल्ली – मागील काही महिन्यांपासून जीएसटी संकलनाचा आकडा एक लाख कोटींच्या पार होत आहे. पण हाच संकलनाचा आकडा जून महिन्यात एक लाख कोटींच्या खाली आला होता. त्यानंतर जुलै महिन्यात पुन्हा एकदा सकारात्मक परिणाम दिसून आले आणि एक लाख कोटींच्या पार कलेक्शन जमा झाले होते. ऑगस्ट महिन्यातही संकलनाचा आकडा एक लाख कोटींच्या पार गेला आहे. सरकारी तिजोरीत गेल्या महिन्यात १.१२ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. ऑगस्ट २०२० या महिन्याच्या तुलनेत ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.

सरकारच्या तिजोरीत जीएसटीच्या माध्यमातून १ लाख १२ हजार २० कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. यात राज्याची कर रक्कम २६ हजार ६०५ कोटी आणि केंद्राचा वाटा २० हजार ५२२ कोटी आहे. तर एकीकृत जीएसटी ५६ हजार २४७ कोटी आहे. एकीकृत जीएसटीत २६ हजार ८८४ कोटी आयातीच्या माध्यमातून आले आहेत. तर उपकर ८ हजार ६४६ कोटी जमा झाला आहे. ६४६ कोटी आयतीवरील उपकरातून मिळाला आहे. जीएसटीची रक्कम १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान जीएसटीआर-३ बी च्या माध्यमातून जमा झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्यानंतर जीएसटीच्या वसुलीत वाढ होत आहे.