शरद पवारांची नारायण राणेंच्या अटकेवर मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया


मुंबई – काल महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विरोधात शिवसेनेने अतिशय आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आज सकाळपासूनच शिवसेना व भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे दिसत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत.

या सर्व घडामोडींवर राजकीय नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असताना, आता यावर अगदी मोजक्याच शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली. या प्रकरणावर मला काही बोलायचे नाही. त्याला मी फारसे महत्व देत नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात, अशा मोजक्याच शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जुहू येथील नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आलेल्या मोठा गोंधळ उडाला आहे.