शिक्षण विभागाच्या शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना


मुंबई – आज महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना व त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. शहरी भागातील इयत्ता आठवी ते दहावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीची शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करणेबाबत या सूचना आहेत.

ज्या महापालिकेत शाळा सुरू करणे शक्य आहे, तिथे मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा सुरू होतील. शहरी भागात कोरोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार पालिका आयुक्तांना असतील, तर जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावा. महापालिका क्षेत्रात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी खास समिती गठित केली जाणार आहे. तसेच, नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामपंचायत, स्तरावरही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठित होणार आहे.

कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झालेला असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे ब्रेक दि चेन अंतर्गत नव्या मार्गदर्शक सचूना आदेश २ ऑगस्ट नुसार काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाकाळातील निर्बंधांसंबंधी निर्णयाबाबत संबंधित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना व इतर जिल्हयांमध्ये शाळांसंबंधी निर्णयाबाबत शालेय शिक्षण विभागास अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ व्हाव यासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये शाळांचे वर्ग सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या यापूर्वी ७ जुलै २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार कोरोनामुक्त ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. तर, ब्रेक दि चेन सुधारित मार्गदर्शक सूचना विचारात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग व ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याची बाबही शासनाच्या विचाराधीन होती.