मराठा आरक्षण :… अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरु करु – संभाजीराजे


पुणे – मराठा आरक्षणावरुन आंदोलन पुकारणारे राज्यसभा खासदार संभाजीराजेंनी पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा इशारा दिला आहे. आता नांदेड येथे पुढचे मूक आंदोलन होणार असल्याचे पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये संभाजीराजेंनी म्हटले आहे. तसेच मी सुद्धा आता तेच तेच बोलून थकलो असल्याचे म्हणत त्यांनी आपली या मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन होत असलेल्या विलंबाबद्दलची नाराजी व्यक्त केली. पण त्याचवेळेस त्यांनी मराठा आरक्षणासाठी आता थेट मुंबईतील आझार मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषण करण्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे.

आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषणास करण्याची माझी एकट्याची तयारी आहे. तुम्हीच ठरवा आणि सांगा, असे संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना आणि कार्यकर्त्यांना सांगितले आहे. नांदेड येथे २० ऑगस्ट रोजी मूक आंदोलन होणार होणार असल्याची घोषणा या कार्यक्रमामध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वयकांनी केली.

संभाजीराजेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपसमितीच्या सदस्य मंत्र्यांना १५ जुलै रोजीच पत्र लिहिले असून आपली नाराजी जाहीर केली होती. राज्य शासनाने मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन दि. १७ जून रोजी बैठक घेतली. समाजाच्या मागण्या या बैठकीत शासनस्तरावर मान्य करण्यात आल्या. पण प्रशासनाने त्यांच्या पूर्ततेसाठी कालावधी मागितला होता. आता एक महिना पूर्ण होऊनदेखील प्रशासनाने कार्यवाही केली नसल्याचे यावेळी संभाजीराजेंनी म्हटले होते.

मराठा समाजाचे शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आम्ही राज्य शासनाकडे मराठा समाजास शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या काही मागण्या समाजामार्फत मांडल्या होत्या. या मागण्या आरक्षणाइतक्याच महत्त्वपूर्ण असून या मागण्यांच्या पूर्ततेनंतर मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीस हातभारच लागणार आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी समाजास वेठीस न धरता थेट लोकप्रतिनिधींची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही मूक आंदोलनाचा पर्याय निवडला.

राज्य शासनाने आम्हाला दि. १६ जून रोजी कोल्हापूर येथे झालेल्या मूक आंदोलनानंतर मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकीस निमंत्रित केले. दि. १७ जून रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सदस्य मंत्रीगण, राज्याचे महाधिवक्ता यांचेसह राज्यातील प्रमुख समन्वयक व संबंधित सर्व शासकीय विभागांचे मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, अशी आठवण संभाजीराजेंनी करुन दिली होती.

समाजाच्या प्रमुख मागण्यांविषयी सविस्तर व सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मंत्रिगणांनी समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असता, उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यानुसार कार्यवाही करून मागण्यांची पूर्तता करणेबाबत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणेसाठी कालावधी मागितला होता. याबाबत राज्य शासनाचे वतीने करण्यात आलेल्या विनंतीनुसार आम्ही नियोजित मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलले होते.

हा एक महिन्याचा अवधी संपत आला असून राज्य शासनाने बैठकीत घेतलेल्या निर्णयांची पूर्तता व अंमलबजावणी करणेसाठी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही, अशी खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली होती. जरी राज्य शासनाने समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असल्या, तरी प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सदस्य मंत्रीगण यांनी या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने विचार करून, संबंधित सर्व प्रशासकीय विभागांकडून मागण्यांबाबत झालेल्या निर्णयांचा कार्य अहवाल त्वरीत मागवून या मागण्या मार्गी लावून त्यांची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू, असा इशाराच संभाजीराजेंनी दिला होता. आज अशाच पद्धतीने त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये इशारा दिला असून नांदेडमध्ये मूक आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.