मुंबईच्या पालिका आयुक्तांचे दानवेंना उत्तर; रेल्वे प्रशासनाशी चर्चा करुनच घेतला लोकल सुरु करण्याचा निर्णय


मुंबई – मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मुंबई लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व महत्वाच्या रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठका झालेल्या आहेत, असे सांगून, एकप्रकारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उत्तर दिले आहे. रावसाहेब दानवे यांनी लोकल सुरू करण्याबाबताच निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती, असे म्हटले होते. केंद्रीय राज्यमंत्र्यांचा हा आरोप मनपा आयुक्त चहल यांनी फेटाळून लावल्याचे दिसून आले आहे.

गुरूवारी स्वत: माझ्या कक्षामध्ये जनरल मॅनेजर, सेंट्रल रेल्वे अनिल लाहोटी आले होते, आमची या विषयी तासभर चर्चा झाली. त्यांनी देखील सांगितले की आपल्याला पुढाकार घेतला पाहिजे. आपण मासिक पास दिले पाहिजे, क्यूआर कोड लावला पाहिजे आदी बाबींचा सर्व विचार करून चर्चा करून रेल्वेशी आम्ही हे मुद्दे मुख्यमंत्र्यांकडे दिले होते. जेणेकरून निर्णय घ्यायला हरकत नसावी. सर्वांना विश्वासात घेऊनच आपण हे करत असल्याचे एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत इक्बाल चहल यांनी बोलताना सांगितले आहे.

तसेच, मुंबई महानगरपालिका लोकल प्रवासासाठी यंत्रणा उभारण्याची जबाबदारी घेणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासीही या अॅपचा वापर करु शकतात. पात्र प्रवाशांना पास काढून प्रवास करता येईल. पाससाठी दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा अखेर १५ ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ऑगस्टपासून लोकल सेवा सुरु करत असल्याचे जाहीर केले. लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलने प्रवास करण्याची परवानगी असणार असून यासाठी काही अटी आणि शर्थी लावण्यात आल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचे स्वागत केले असून, यावेळी त्यांनी निर्णय जाहीर करण्याआधी रेल्वेसोबत चर्चा करायला हवी होती, असे मत एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केले आहे.