या पठ्ठ्याने अवघ्या 12 मिनिटांत फस्त केले पासष्ट पदार्थ


33 वर्षीय अ‍ॅडम मॉरेन या तरुणाने सकाळाच्या नाश्त्याच्या वेळी महाथाळीतील तब्बल 65 पदार्थ फस्त केले आहेत. केवळ 12 मिनिटांत 5 हजार कॅलरीज असलेला आहार संपवून तृप्तीचा ढेकर दिलाच, त्याच्या नावे एक उच्चांकही जोडला गेला. यूट्युबवरील अ‍ॅडम मॉरेन हा प्रसिद्ध व्यक्ति असून तो इंग्लंडमध्येच जन्मला आणि वाढला आहे. ज्या खाद्यपदार्थांच्या अधिकाधिक सेवन करण्याच्या स्पर्धा असतात, तो त्यात हिरिरीने भाग घेतो.

त्याचा ‘बिअर्ड मिट्स फूड’ हा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. व्यवसायाने तो बँकर आहे. पण त्याला खरी ओळख यूट्युबर म्हणून मिळाली. तो स्वत:च्या खादाडीच्या उच्चांकांचे चित्रण करतो आणि यूट्यूबवर प्रसारित करतो. नुकत्याच केलेल्या उदरभरण विक्रमाचे त्याने यूट्युबवरून प्रसारण केले. एकूण तीन लाख ‘व्ह्यू’ त्याला मिळाले होते आणि अद्यापही मिळत आहेत.

‘टर्मिनेटर टू’ नामक कार्यक्रम लंडनमधील नॉटिंगहॅमशायर येथे शेफर्ड प्लेसमध्ये आयोजित करण्यात आला होता. ‘टर्मिनेटर टू’ ही गमतीशीर संज्ञा चविष्ट, रंगतदार अनेक पदार्थांच्या महाथाळीसाठी असावी. अन्न पदार्थांची चव घेण्यासाठीचा हा रसिक इंग्लंडवासीयांचा आवडता कार्यक्रम आहे. काही कामानिमित्त मॉरेन शेफर्ड प्लेस येथे आला होता. या हॉटेलमध्ये थांबून त्याने हे आव्हान स्वीकारण्याचे ठरविले. अजब विक्रमाबद्दल प्रसारित झालेल्या व्हिडीओमध्ये ६५ पदार्थांवर ताव मारताना तो दिसतो. अगदी कमी वेळेत प्लेटमधील पदार्थ संपविताना त्याला पाहून अचंबा वाटतो.

अ‍ॅडम हे आव्हान स्वीकारताना चाहत्यांशी ऑनलाइन गप्पाही करताना दिसतो. पदार्थांची तारीफ करतो. मनमुराद दाद देत ते खूप उत्तम असल्याचे सांगतो. तो आपल्या पोटात बेकन, सॉसेजेस, अंडी, टोस्ट, बेक्ड बीन्स, मश्रूम्स, कॉफी, टोमॅटोचे काप अशा नाना पदार्थांना आश्रय देतो. असे असले तरी अ‍ॅडम हा महाथाळी संपविणारा एकमेव नाही. यापूर्वी अशी भरपूर पदार्थ फस्त करण्याची कमाल तीन जणांनी केली आहे. पण अ‍ॅडम याने जो वेळ घेतला, तो त्यांच्यापेक्षा खूपच कमी आहे.

Leave a Comment