राज कुंद्रावर भाजप आमदार राम कदमांचे गंभीर आरोप


मुंबई – आता दिवसेंदिवस पॉर्न फिल्म प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रा समोरील अडचणी अधिकच वाढत असल्याचे दिसत आहे. आज राज कुंद्रावर पत्रकारपरिषदेत बोलताना भाजप प्रवक्ते व आमदार राम कदम यांनी गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. राम कदम म्हणाले आहेत की, ऑनलाईन गेम ‘गॉड’च्या माध्यमातून राज कुंद्रा व त्यांच्या कंपनीने हजारो कोटी रुपये लुबाडले आहेत. तसेच, गॅम्बलिंग गेमद्वारे पैसे उकळले आणि वितरणाच्या नावाखाली गरिबांचे पैसै लुटल्याचाही आरोप राम कदम यांनी राज कुंद्रावर केला आहे.

तसेच, पत्रकारपरिषदेत बोलताना राम कदम म्हणाले, या गेमच्या प्रचारासाठी राज कुंद्राने अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाचा व फोटोंचा वापर केला होता. राजु कुंद्राने ऑनलाईन गेम GOD च्या माध्यमातून फसवणुक केली. शिल्पा शेट्टीच्या गुणांचा आम्ही सन्मान करतो, पण या गेमच्या प्रचारासाठी शिल्पा शेट्टीच्या चेहऱ्याचा देखील वापर केला गेला. राज कुंद्राची विआन इंडस्ट्री नावाची कंपनी आहे, ज्यामध्ये ते संचालक आहेत.


विआन कंपनीचा GOD (Game of Dots) नावाचा एक गेम आहे. हा एक लीगल ऑनलाइन गेम असल्याचे सांगितले आहे. विआन कंपनीच्या लेटरहेडवर शिल्पा शेट्टीच्या फोटोचा प्रमोशनसाठी वापर केला जात होता. असे सांगितले गेले आहे की हा खेळ सरकारमान्य आहे. या खेळात बक्षिसाची रक्कम दिली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. देशभरातील लोकांना लुटले गेले आहे. २५०० ते ३००० कोटींचा घोटाळा विआन इंडस्ट्रीने केला आहे.

राम कदम यांनी म्हटले आहे की, ऑनलाईन गेमच्या नावाखाली कुणाकडून ३० लाख तर कुणाकडून १५ ते २० लाख रुपये घेतले गेले. गेमच्या डिस्ट्रीब्यूशनच्या नावाखाली लोकांना फसवले गेले व त्यांचे पैसे लुटले. काही जणांना डिस्ट्रिब्यूटरशिप दिली, तर काही जणांना तसेच ठेवले. काहींना तत्काळ लक्षात आले की ही फसवेगिरी आहे. अशाप्रकारे गरिबांना लुटण्याचा अधिकार राज कुंद्राला कुणी दिला? असा सवालही राम कदम यांनी केला आहे. तसेच, राम कदम यांनी हे देखील सांगितले की, यामध्ये फसवले गेलेले लोक जेव्हा राज कुंद्राच्या ऑफिसवर पैसे मागण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना बाउंन्सने मारहाण केली.