चाला आणि वजन घटवा


जेव्हा वजन कमी करण्याचा निर्णय घेतला जातो, तेव्हा कडक आहारनियम आणि शेकडोने कॅलरीज खर्च होतील असा व्यायाम असे समीकरण आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. वजन कमी करण्याच्या दृष्टीने आहारावर नियंत्रण असणे महत्वाचे आहे हे तर खरेच, पण त्यासाठी अगदी अवघड, अशक्यप्राय वाटणारे व्यायामप्रकार आपल्या रुटीनमध्ये समाविष्ट करावेच असे नाही. आहारावर उत्तम नियंत्रण असले, तर चालण्यासारख्या ‘लो इम्पॅक्ट’ व्यायामप्रकाराने देखील वजन नियंत्रणात ठेवणे सहज शक्य होऊ शकते. आजकाल आपल्या मोबाईल फोन्सवर अनेक फिटनेस अॅप्स उपलब्ध आहेत, तसेच हातात घालण्याचे फिटनेस बँडही आजकाल खूपच लोकप्रिय झाले आहेत. या बँडच्या किंवा अॅपच्या माध्यमातून आपण किती किलोमीटर चाललो, त्यामध्ये किती कॅलरीज खर्च झाल्या, हृदयाच्या ठोक्यांची गती इत्यादी माहिती आपल्याला सतत उपलब्ध होत असते. या अॅपच्या किंवा बँडच्या मदतीने दररोज पंधरा हजार पावले चालण्याचे ध्येय ठेवावे. यामध्ये व्यायाम म्हणून चालण्याव्यतिरिक्त दिवसभराच्या कामाच्या निमित्ताने झालेले चालणेही अंकित होत असते, त्यामुळे संपूर्ण दिवसामध्ये पंधरा हजार पावले चालणे फारसे अवघड ध्येय नाही.

आहारशास्त्रज्ञ आणि फिटनेस एक्स्पर्ट्सच्या मते दररोज किमान वजन घटविण्यासाठी दररोज किमान साठ मिनिटे चालणे आवश्यक असते. अनेकांना दिवसभराच्या कामातील व्यस्ततेमुळे सलग एक तास चालण्यासाठी काढणे अवघड असते. अश्या वेळी सलग एक तास न चालता दिवसातून तीन वेळा वीस-वीस मिनिटे चालावे. विशेषतः दर भोजनाच्या नंतर वीस मिनिटे चालण्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होतेच, शिवाय रक्तातील ब्लड शुगर लेव्हल्सही नियंत्रित राहतात. याच कारणास्तव भोजनानंतर शतपावली घालण्याचा प्रघात पूर्वीच्या काळी देखील रूढ होता. चालण्यास बाहेत पडताना समतल भूभागावर चालताना, चढावर चालण्याचाही सराव करावा. चढावर चालल्याने स्नायू बळकट होतात व शरीराची चयापचय शक्ती वाढते. चढावर चालताना थोडेसे पुढे झुकून सावकाश चालावे. जास्त जोरात चालल्याने स्नायूंवर अवास्तव तणाव पडण्याची शक्यता असते. सुरुवातीला कमी वेळ चढावर चालावे, कालांतराने अंतर आणि वेग दोन्ही वाढवत न्यावे.

चालण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी ग्रीन टीचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. त्याचप्रमाणे साखर असलेले पदार्थ किंवा प्रोसेस्ड पदार्थांचे सेवन वर्ज्य करावे. आजकाल व्यायाम करताना ‘गेटोरेड’ किंवा ‘एनर्जी ड्रिंक्स’चे सेवन सर्रास केले जाते. मात्र या ड्रिंक्समध्ये साखरेची मात्रा जास्त असते. त्यामुळे अश्या पेयांच्या ऐवजी साधे पाणी पिणे कधीही चांगले. चालणे हा व्यायाम कधीही आणि कुठेही करता येणे शक्य आहे. त्यासाठी अनेक पर्यायांचा अवलंब करता येईल. घराच्या जवळच कुठे जायचे असल्यास गाडीचा वापर टाळून चालत जावे, तसेच ऑफिसपासून काही अंतरावर गाडी पार्क करूनही उरलेले अंतर चालत जाण्याचा विचार करता येऊ शकतो. ऑफिसमध्ये बैठे काम असल्यास थोड्याथोड्या वेळाने ऑफिसमधेच पायी चालावे. त्यामुळे चालणेही होते आणि पायातील रक्ताभिसरण सुरळीत राहण्यास मदत होते. जिथे शक्य असेल तिथे लिफ्टने जाण्याच्या ऐवजी जिन्यांचा वापर करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment