रात्रीचे भोजन आणि आरोग्य


शरीराला जडणाऱ्या बहुतेक व्याधींचा थेट संबंध पोटाशी आहे हे विधान आयुर्वेदाने अनेक शतकांपूर्वी करून ठेवले आहे. किंबहुना रात्रीचे भोजन संध्याकाळी सात वाजण्याच्या आत संपविणे हा आरोग्याचा मूलमंत्र असल्याचेही तज्ञांचे मत आहे. रात्रीचे भोजन आणि झोपेची वेळ यांमध्ये किमान तीन तासांचे अंतर असणे आवश्यक असल्याचे आहारतज्ञ सांगतात. मात्र आजच्या काळामध्ये कामाच्या निमित्ताने घराबाहेर राहणाऱ्या मंडळींना, सातत्याने प्रवास किंवा नाईट शिफ्ट्स करणाऱ्या मंडळींना हा आरोग्यनियम अवलंबणे सहज शक्य होणारे नसते.

आयुर्वेदाच्या अनुसार आपल्या शरीराची पचनसंस्था अनेक गोष्टींवर अवलंबून असते. सूर्योदय होतो तेव्हा जठराग्नीही प्रदीप्त होत असतो, आणि शरीरातील पचनक्रिया सक्रीय होत असते. आणि सूर्य मावळतो, तेव्हा जठराग्नी मंद होत असतो व त्याचबरोबर पचनक्रियाही मंदावते. म्हणूनच प्राचीन काळामध्ये सूर्यास्तापूर्वी रात्रीचे भोजन घेण्याची पद्धत रूढ होती. सूर्यास्तानंतर घेतलेले भोजन व्यवथित पचत नसून, ते आतड्यांमध्ये राहते आणि सडते. त्यामुळे शरीरामध्ये निरनिराळे विषारी घटक तयार होत असतात. म्हणूनच रात्री उशीरा भोजन घेण्याची सवय असणाऱ्या व्यक्तींमध्ये अपचन, गॅसेस, पोट फुगणे, पित्त, रात्रीची झोप शांत न लागणे इत्यादी समस्या जास्त आढळतात.

पण ज्या व्यक्ती कामानिमित्त रात्री उशीरापर्यंत बाहेर राहतात, किंवा ज्यांना काही ना काही कारणामुळे सूर्यास्तापूर्वी भोजन घेता येत नाही अश्या मंडळींनी काय करावे? सूर्यास्तापूर्वी भोजन घेणे सर्वोत्तम आहे हे जरी आयुर्वेदाने सांगून ठेवले असले, तरी ज्यांना भोजन रात्री उशीरा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यांनी अन्नाचे पचन व्यवस्थित व्हावे आणि पचनाशी निगडित समस्या उद्भवू नयेत यासाठी काय करावे, याचे उपाय देखील आयुर्वेदानेच सांगितले आहेत. रात्री उशीरा जेवणार असाल, तर भोजनापूर्वी एका लहानशा आल्याच्या तुकड्यावर काळे मीठ भुरभुरावे आणि हा आल्याचा तुकडा चावून खावा. आल्याचा रस, त्यातील फायबर आणि काळे मीठ यामुळे पचनक्रिया सक्रीय होण्यास मदत होते. त्यामुळे रात्री उशीराने घेतलेले भोजनही व्यवस्थित पचण्यास मदत होते.


उजव्या हाताच्या अनामिकेने दावी नाकपुडी बंद करावी आणि उजव्या नाकपुडीने खोल आणि दीर्घ श्वास घ्यावा. आता उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करून डाव्या नाकपुडीतून श्वास सावकाश सोडवा. यालाच सूर्यभेदी प्राणायाम म्हटले जात असून, ही एक प्राचीन योगिक श्वसनक्रिया आहे. भोजनापूर्वी केवळ तीस सेकंदांसाठी सूर्यभेदी प्राणायाम केल्याने पचनक्रिया सक्रीय होत असते. रात्रीच्या भोजनाच्या आधी काही वेळ, नऊ वेळा सूर्यभेदी प्राणायाम करावा. त्यानंतर काही वेळाने भोजन घ्यावे. भोजन घेत असताना आपले सर्व लक्ष आपण खात असलेल्या अन्नावर केंद्रित करून सावकाश भोजन करावे. भोजन झाल्यानंतर त्वरित आडवे होण्याचा मोह टाळून घरातल्या घरात शतपावली करावी. यावेळी आपण किमान पाचशे पावले चालावे.

जर खूपच थकवा आला असेल आणि चालण्याची इच्छा नसेल तर पंधरा मिनिटे वज्रासन घालून बसावे. यावेळी आपल्या शरीरातील पचनक्रिया कार्यरत झालेली असते, त्यामुळे जेवल्यानंतर त्वरित झोपू नये. वज्रासनामुळे शरीरातील रक्तप्रवाह पोटाकडे संचलित केला जातो. त्यामुळे अन्नाचे पचन अधिक उत्तम प्रकारे होते. सर्वसामान्यपणे रात्रीचे भोजन आणि झोप यांमध्ये किमान तीन तासांचे अंतर असणे आवश्यक आहे. तसेच झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. डाव्या कुशीवर झोपल्याने आपला श्वासोच्छवास मुख्यत्वे उजव्या नाकपुडीद्वारे होत असतो. त्यामुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया सक्रीय रहात असते. तसेच डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील पाचक अॅसिड्स वर येत नाहीत. त्यामुळे रात्री उशीरा भोजन झाल्याने देखील अन्नाचे पचन व्यवस्थित रित्या होऊ शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment