बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील – अजित पवार


पुणे – बकरी ईदसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी सारखेच धोरण असेल असे अजित पवारांनी यांनी पुण्यात बोलताना स्पष्ट केले. अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. देशातील सर्व सण कोरोनामुळे साधेपणाने साजरे करण्यात येत असल्यामुळे बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील, असे अजित पवार म्हणाले.

देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवल्यामुळे सरकारने खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे. नागरिकांना सण उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. बकरी ईद सणासाठी राज्य सरकारने गेल्यावर्षी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या त्याच सुचना यावर्षी सुद्धा लागू असतील.

अशा होत्या गेल्यावर्षीच्या मार्गदर्शक सूचना

  • कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यास अनुसरुन बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.
  • सध्या कार्यान्वित असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी.
  • शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी नागरिकांनी करावी.
  • सध्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लागू करण्यात आलेले निबंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही.
  • नागरिकांनी बकरी ईदच्या निमित्ताने कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये.
  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.