कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू


पुणे – लोणावळ्यातील पर्यटनस्थळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू करण्यात आले असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच, वाहनांना धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात बंदी घालण्यात आली आहे. लोणावळ्यातील पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दी करत असल्यामुळे आजपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

लोणावळ्यातील भुशी धरण तुडुंब भरले आणि पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहू लागले, असे म्हणताच हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. हाच प्रत्यय दरवर्षी येतो. दरम्यान, पर्यटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव आहे. पण, नियमांची एैशीतैशी करून पर्यटक लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पोहचताच. कोरोनाची दुसरी लाट ओसरली, पण तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करून नये, नियमांचे पालन करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केले होते. पण, त्यांच्या या आवाहनांकडे दुर्लक्ष करून नागरिक गर्दी करत असल्याचे पाहायला मिळाले.

लोणावळ्यात शनिवार आणि रविवार रोजी तर हजारो पर्यटक दाखल होतात. लोणावळ्यातील पर्यटनस्थळी याच पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू करण्यात आले असून पाच किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. त्याच बरोबर धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाच्या नियमांचे स्वागत करून नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.

दरम्यान भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, एकविरा मंदीर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा, धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहतील.