महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार राज्यातील १५ हजार जागांवर नोकरभरती


मुंबई – पदभरतीच्या निर्बंधामधून सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना सूट देण्यात आली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ ते क पर्यंतची एकूण १५ हजार ५११ पदे भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि रिक्‍त पदांच्या भरतीच्या अनुषंगाने बैठक झाली. काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग इत्यादी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. तसेच गट अ ची ४४१७ पदे, गट ब ची ८०३१ पदे आणि गट ‘क ची ३०६३ पदे अशी एकूण १५ हजार ५११ पदे भरण्यास वित्त विभागाने सन २०१८ पासून मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने या पदांचे आरक्षण तपासून पद भरती गतीने राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यावर प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने एमपीएससी सदस्यांची चार रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. जुलै अखेरपर्यंत सदस्यांची ही पदे भरण्यासाठी सर्व प्रक्रिया पार पाडण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यसंख्येत वाढ करण्याच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा करण्यात आली. जेणेकरुन भविष्यातील मुलाखती गतीने पार पाडता येतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. दरवर्षी पुढील संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (युपीएससी) जाहीर केले जाते. त्याच धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षांचेही वेळापत्रक जाहीर करण्याबाबतचे निर्देशही देण्यात आल्याची माहितीही भरणे यांनी यावेळी दिली.