लवकर जाहीर करावी ‘सारथी’साठीची १ हजार कोटींची मदत – छत्रपती संभाजीराजे


कोल्हापूर – मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राज्यात सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेवरून बराच वादंग सुरू झाल्याचे दिसून आले आहे. आज कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना आता छत्रपती संभाजीराजे यांनी देखील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारथी’संदर्भात लक्ष केंद्रीत करावे, असे म्हणत १ हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी अशी मागणी केली आहे. तसेच, सारथी बोर्डाची महत्वाची बैठक १४ जुलै रोजी होणार असून, या बैठकीनंतर पुढील रुपरेशा ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संभीजीराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले, १९ जून रोजी आमची बैठक झाल्यानंतर बोर्ड मिटींग ताबडतोब होणे अपेक्षित होते, पण ती आता १४ जुलै रोजी ही ठरलेली आहे. बोर्ड मिटींगमध्ये १९ जूनचे जे मुद्दे ठरलेले होते, ते परत एकदा अभ्यासले जातील. त्यावर चर्चा केली जाईल आणि पुढील दिशा ठरणार आहे.

तसेच, एकच खंत आजही आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरात लवकर त्यावर लक्ष केंद्रीत करावे, ती म्हणजे आम्ही १ हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. मलाही कल्पना आहे की हजार कोटी एक वर्षात खर्च करणे, एवढे सोपे नाही. तुम्ही फेज १,२,३ असे करू शकता. सारथीच्या बाबतीत एक महिना आता जवळपास होत आलेला आहे. सरकारने त्यावर लक्ष केंद्रीत करावे.

सारथीला खर्चासाठी जो निधी लागणार आहे, तो अद्याप अर्थ विभागाकडून आलेले दिसत नाही. जी काही मागणी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी केली असेल, माझ्या अंदाजाप्रमाणे ८०० ते ९०० कोटींची त्यांनी मागणी केली आहे. तरी, लवकरात लवकर उपमुख्यमंत्री अजित पवार व अर्थ विभागाने यामध्ये लक्ष घालून हा निधी लवकरात लवकर जाहीर करावा. जेणेकरून त्यांनी जे ठरवलेले आहे की, वर्षभरात काय कामे करायची, ती मार्गी लागतील. यामुळेच १४ जुलै रोजी होणाऱ्या बोर्ड मिटींग नंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील.

एक महिन्याची मूदत आम्ही दिली होती, ती आता संपत आलेली आहे. म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती आहे की अगोदर तुम्ही मागण्या मान्य केलेल्या आहेत, पण त्या ऑनपेपर यायच्या आहेत. बोर्ड मिटींगच झालेली नाही. पण तोपर्यंत तुम्ही आमची हजार कोटींची मागणी फेज १,२,३ च्या माध्यमातून जाहीर करावी.