कोरोनानंतर आता झिका व्हायरसने वाढवली चिंता!, केरळमधील आणखी १४ जणांना झिकाची लागण


नवी दिल्ली – देशावर एकीकडे कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच आता दुसरीकडे झिका व्हायरसचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात १४ जणांना झिका व्हायरसची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. १४ जणांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले आहे.

कोरोनाप्रमाणे हा व्हायरस जीवघेणा नसल्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास त्यावर मात करता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार, डासांच्या चावण्यापासून स्वत:चा बचाव करणे आणि लागण झाल्यास पुरेसा आराम करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मात्र असे असले तरी केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी तातडीची बैठक बोलावली असून परिस्थितीवर नजर ठेवण्यास सांगितले आहे.

केरळमध्ये झिका व्हायरसची लागण सर्वात प्रथम एका गर्भवती महिलेला झाल्याचे समोर आले. ज्या रुग्णालयात ही महिला उपचार घेत होती, तेथील काही नर्स आणि डॉक्टरांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवले होते. त्यात ती पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या २४ वर्षीय महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्हायरसचा गर्भवती महिलांमधून त्यांच्या पोटातील बाळांना देखील संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांना अधिक काळजी घेण्यास सांगितले जात आहे.