मुंबई – भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. दरम्यान या चर्चांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मौन सोडले असून आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या देशातील आणि राज्यातील नेत्यांचे अभिनंदन करत सुरु असलेल्या चर्चांना मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पूर्णविराम दिला आहे.
अखेर मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या नेत्यांचे पंकजा मुंडेकडून अभिनंदन
दुपारपर्यंत संभाव्य नेते असे अभिनंदन करणे योग्य नव्हते, असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले आहे. नेहमी आमच्या नावाची चर्चा असते. प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती. त्या दिल्लीत दाखल झाल्याची चुकीची माहितीही देण्यात आली. मला तर काही कार्यकर्त्यांनी दिल्लीसाठी निघालो असल्याच्या तिकीटाचे स्क्रीनशॉट पाठवले होते. गैरसमज होऊ नये म्हणून मी मुंबईत असल्याचे स्पष्टीकरण दिले. मी त्यावरुन नाराज असल्याचा कयास लावण्यात आला. मी नाराज असण्याचे कारण नाही. मुंडे साहेबांचे आमच्यावर संस्कार आहेत. कोणाला संधी मिळाली तर आनंद वाटणे कर्तव्य असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
भारती पवार, कपिल पाटील यांच्याशी मी बोलले होते. त्यांना आदल्या दिवशी मेसेज आल्याने ते दिल्लीत होते आणि प्रीतम मुंडेंना मेसेज नसल्यामुळे त्या मुंबईत होत्या. काही महान लोकांनी पंकजा मुंडेंनी ट्वीट केले म्हणून प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद गेले, असे म्हटलं असून हे हास्यास्पद असल्याचेही यावेळी त्या म्हणाल्या.
भागवत कराड यांचा रात्री १२.३० वाजता फोन आला होता. मुख्यालयातून फोन आला होता आणि मी दिल्लीत दाखल झालो असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. माझे लोकांशी नाते आहे, संबंध नाही. नाते कधीच तुटत नाही, पण संबंध कडू गोड होत असतात. लोकांचे प्रेम असल्यामुळे ते व्यक्त होत असतात, असे यावेळी त्या म्हणाल्या.
भाजपमध्ये एक पद्धत आहे, त्याचप्रमाणे निर्णय घेतले जातात. सगळ्या राज्यांच्या बाबतीत वेगवेगळे निर्णय झाले होते. फक्त प्रीतम मुंडे नाही तर हिना गावित यांचेही नाव चर्चेत होते. नव्या लोकांना संधी देण्यास काही हरकत नाही, त्यांच्यात काही गुण असू शकतात, जे पक्षासाठी भविष्यात फायद्याचे ठरु शकतात. त्यामुळे हरकत असण्याचे काही कारण नसल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
जे मत असते ते वैयक्तिक असते. ते जाहीरपणे व्यक्त करायचे नसते. प्रीतम मुंडे यांचे नाव होते आणि ते योग्य होते. विक्रमी मताने त्या निवडून आल्या आहेत. त्यांनी छान काम केले, खूप हुशार आहेत. सर्व बैठकींना त्या उपस्थित असतात. कोणताही कार्यक्रम डावललेला नाही. तरुण आहेत, बहुजन चेहरा आहेत. म्हणून त्यांचे नाव न येण्यासारखे काही नाही. केवळ प्रीतम ताईंचेच नाव आले नाही असे नाही. चर्चा नावाच्या वलयामुळे होत असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या.
पक्षाचे निर्णय पटण्याचा विषय नाही. कारण पक्षाने मला फॉर्म भरायला लावला, तेव्हाही मी पात्र आहे का असे विचारले होते. नंतर त्यांनी रमेश आप्पा कराड यांचे नाव अंतिम झाल्याचे सांगितले होते. तो निर्णयही मला पटला होता. पक्ष आमच्या संस्कारात अंतिम सत्य असल्यामुळे निर्णय पटणे आणि न पटणे हा प्रश्न नसतो, असे पंकजा मुंडेंनी म्हटले.
पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव असल्याचे सामनामध्ये म्हणण्यात आले आहे, यासंबंधी विचारण्यात आले असता, भाजपला मला संपवायचे आहे, असे मला वाटत नाही. मला वाटत नाही की मी एवढी मोठी आहे की पंतप्रधानांपासून सर्व कामाला लागतील. त्यांनी जे लिहिले आहे ते वाचले नाही. वाचल्यावर नक्की प्रतिक्रिया देईन, असे म्हटले.
कराडांना मुंडेंना पर्याय म्हणून पुढे केले जात आहे का? असं विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, राजकारणात मी व्यवसाय म्हणून आले नाही. मी व्रत म्हणून आले आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर बिखरलेल्या संतप्त समाजाला एका ठिकाणी आणणे माझ्यासाठी आव्हान होते. मुंढेंनी बसवलेली घडी विस्कटू नये, माझी जबाबदारी आहे. मी वंजारी समाजाबरोबरच राज्यातील नेता आहे. वंजारी समाजातील नेता मोठा होत असेल, तर मी त्यांच्या पाठीशी उभी आहे.