सुधीर मुनगंटीवार यांचे ते वक्तव्य धमकी देणारे; नाना पटोलेंचा गंभीर आरोप


मुंबई: आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत तुफान राडा झाला. भाजपच्या १२ आमदारांना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी थेट वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले. अशात भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांना बोलताना मध्ये टोकणाऱ्या सत्ताधारी आमदारांना अनिल देशमुख यांचा दाखल देत सुनावले. यावर आक्षेप नोंदवत मुनगंटीवारांचे वक्तव्य आक्षेपार्ह असून ही धमकी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा समाचार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला. सत्ताधारी पक्षांचे सदस्य विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर बोलत होते. पण यावेळी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. विधिमंडळात मध्येच बोलल्यामुळे अनिल देशमुख हे आतमध्ये जात असल्याचे मुनगंटीवार म्हणाल्याचे सांगत त्यांचे हे वक्तव्य धमकी देणारे असल्याचे पटोले म्हणाले. आता सभागृहात धमकी देण्यापर्यंत भाजपची मजल गेली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. हा प्रकार म्हणजे ईडी, आयकर आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना भाजप नाहक त्रास देत असल्याची कबुलीच आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

सत्तेचा दुरुपयोग भाजप हा करत असून महाराष्ट्रात हा खेळ केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजप खेळत आहे. हे लोकशाहीला घातक असल्याचे नाना पटोले पुढे म्हणाले. आज विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या आजच्या कामकाज पत्रिकेवरच आक्षेप घेतला. फडणवीस यांच्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर बोलत असताना सत्ताधारी आमदारांनी सुधीर मुनगंटीवार यांना मध्येच टोकण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर मुनगंटीवार भडकले. तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही, असा सवाल करत अनिल देशमुख हे देखील असेच मध्ये-मध्ये बोलायचे. आता ते आत जात आहेत. त्यामुळे अशा प्रकारे मध्ये-मध्ये बोलू नका, असा टोला मुनगंटीवार यांनी सत्ताधारी आमदारांना लगावला. हरकतीच्या मुद्द्यावर आपण बोलत असून तो आपला अधिकार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तुम्ही मध्ये-मध्ये बोलण्याचे काही एक कारण नसून ही सरकारची चमचेगिरी असल्याचे वक्तव्यही मुनगंटीवार यांनी केले.