मोहन भागवतांनी धर्माबाबत केलेले वक्तव्य म्हणजे, मुंह में राम बगल में छुरी – मायावती


लखनौ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी निशाणा साधला आहे. मोहन भागवत यांनी धर्माबाबत केलेले वक्तव्य म्हणजे ‘मुंह मे राम और बगल मे छुरी’ असे असून कुणीही त्यांच्या या वक्तव्यावर विश्वास ठेवू नका, असे मायावती म्हणाल्या. बळजबरीने आणि लालच दाखवून धर्मांतर करणे चुकीचे असून अशा लोकांविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मायावतींनी केली.

रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखांनी केलेल्या वक्तव्यावर लोकांचा विश्वास बसत नाही. आरएसएस आणि भाजप अँड कंपनी आणि त्यांच्या सरकारांची संकुचित विचारधारा आणि कार्यशैलीत समाज हितासाठी अपेक्षित परिवर्तन होत नाही, तोपर्यंत त्यांच्या बोलण्यावर मुस्लिम समाजाकडून विश्वास ठेवणे अवघड असल्याचे मायावती म्हणाल्या.

धर्मांतराच्या आडून हिंदू-मुस्लिम मुद्दा बनवणे आणि पूर्ण मुस्लिम समाजाला लक्ष्य करणे योग्य नाही. याला बसपा पूर्ण विरोध करेल, असे मायावती म्हणाल्या. मायावतींनी यावेळी केंद्र आणि राज्य सरकारवरही निशाणा साधला. धर्मांतराच्या आडून मोठा कट रचला जात आहे. तर मग एवढ्या कालावधीपासून आपल्या देशाच्या गुप्तचर संस्था काय करत आहेत? असा सवाल देखील मायावतींनी उपस्थित केला.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी गाझियाबादमधील एका कार्यक्रमाला संबोधित केले. सर्व भारतीयांचा डीएनए हा एकच आहे. मग ते कुठल्याही धर्माचे असो. हिंदू-मुस्लिम ऐक्याची चर्चा या निव्वळ भ्रम निर्माण करणाऱ्या आहेत. कारण दोन्ही वेगळे नाहीत, तर एकच आहेत. पूजेच्या पद्धतीवरून फरक केला जाऊ शकत नाही. मॉब लिंचिंग करणारे हिंदुत्व विरोधी असल्याचे भागवत म्हणाले होते.

मायावतींनी यावेळी राफेल विमान सौद्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील केली. फ्रान्समध्ये राफेल प्रकरणी न्यायिक चौकशी करण्यात येत आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य कारवाई करावी, असे मायावती म्हणाल्या.