‘समांतर २’चा नवा प्रोमो रिलीज


सध्या नेटकऱ्यांच्या तोडून ‘समांतर’ या वेब सीरिजची चर्चा होत आहे. १ जुलै रोजी या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये काय पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत. स्वप्नील जोशी, नितीश भारद्वाज आणि तेजस्विनी पंडित ‘समांतर’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. पण आता ‘समांतर २’मध्ये आणखी एका अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे. या सीरिजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये सई ताम्हणकरची झलक दिसली होती. सई कुमार महाजनच्या आयुष्यात गुंतागुंत निर्माण करत असल्याचे दिसत आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये आपण सईची झलक पाहिलेलीच आहे. ज्या नियतीच्या शोधात कुमार आहे, सई त्याचा भाग असेल का? कुमार आणि निमाच्या वैवाहिक आयुष्यात ती व्यत्यय आणणार का? ती चक्रपाणी यांच्यासोबत का दिसली? याचा अर्थ असा आहे की, सई यात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे का? प्रेक्षकांच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सईने या गोपनीयतेने झाकलेल्या व्यक्तिरेखेवर प्रकाशझोत टाकणारा प्रोमो तिच्या चाहत्यांसाठी आणला आहे.


कुमार महाजनने समांतर १ मध्ये सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला. जो आधीच कुमारचे आयुष्य जगला आहे आणि कुमारच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे, हे त्याला माहित आहे. सिझन २ मध्ये चक्रपाणी त्याच्या डायरीत लिहिलेला भूतकाळ कुमारच्या स्वाधीन करतो आणि दरदिवशी एक पान वाचण्यास सांगतो, ज्यात कुमारचे भविष्य लिहिलेले आहे. यादरम्यान त्याच्या आयुष्यात एका स्त्रीचा प्रवेश होणार असल्याचे भाकीत असते. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला हीच नशिबाची साथ आहे का, याचा शोध १० भागांच्या थ्रिलरमध्ये आहे.

१ जुलै रोजी ‘समांतर २’ ही वेब सीरिज रिलीज होणार आहे. सीरिजमध्ये स्वप्नील जोशी, तेजस्वीनी पंडीत, नीतीश भारद्वाज आणि सई ताम्हणकर दिसणार आहेत. ही १० भागांची सीरिज मराठीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना ही सीरिज एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.