लाईव्ह शोदरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा!


केरळ – एका टीव्ही चॅनलच्या लाईव्ह शोदरम्यान केरळच्या महिला आयोग अध्यक्षा एम. सी. जोसेफाईन (M. C. Josephine) यांनी केलेले एक वादग्रस्त वक्तव्य त्यांना चांगलेच भोवले आहे. त्यांच्यावर या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणावर दबाव आल्यानंतर त्यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

महिलांवरील कौटुंबिक अत्याचार आणि अन्याय या विषयावर विशेष म्हणजे एका मल्याळी वृत्तवाहिनीने हे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रामध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर महिला देखील उपस्थित होत्या. जोसेफाईन यांनी त्यांच्या समोरच असे वक्तव्य केल्यामुळे त्यावरून केरळमध्ये आणि सोशल मीडियावर मोठा गदारोळ पाहायला मिळाला.

हे चर्चासत्र एका मल्याळी वृत्तवाहिनीवर सुरू असताना केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षा एम. सी. जोसेफाईन आपली भूमिका मांडत होत्या. फोन-इन सुविधेचा वापर करून एका महिलेने फोनवरून कार्यक्रमात आपली व्यथा मांडली. आपला नवरा आणि सासू आपल्याला घरी मारहाण करतात. त्याविषयी आपण अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही किंवा त्याविषयी अद्याप कुणाला काही सांगितलेले देखील नसल्याचे या पीडित महिलेने फोनवरून सांगितले. जोसेफाई यांचा यावरून ताबा सुटला आणि त्यांनी फोनवरच लाईव्ह शोदरम्यान त्या महिलेला सुनावले. मग भोगा तुम्ही, असे वक्तव्य जोसेफाईन यांनी केले.

हा प्रकार उघड झाल्यानंतर जोसेफाईन यांच्यावर चहुबाजूंनी टीका होऊ लागली. एक महिला आपली व्यथा सांगण्यासाठी पहिले पाऊल उचलून हिंमत करून काहीतरी बोलत होती. त्यावेळी तिला तिच्यावरच्या अन्यायाविषयी बोलण्यासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी तिच्याकडे दुर्लक्ष करून उलट तिलाच सुनावले, अशी टीका त्यांच्यावर केली जाऊ लागली.

दरम्यान, चहुबाजूंनी या प्रकारावरून टीका होऊ लागल्यानंतर जोसेफाईन यांनी या प्रकरणावरून माफी देखील मागितली. एका महिलेने फोन करून तिचा नवरा आणि सासू अत्याचार करत असल्याचे सांगितले. मला कळले की तिने याविषयी एक तक्रार देखील केलेली नाही. आम्ही पोलिसांत तक्रार करावी यासाठी महिलांना कायम सांगत असतो. यामुळे केस अधिक भक्कम होते. पण नंतर मला जाणवले की मी तसे बोलायला नको होते. जर माझ्या बोलण्याने संबंधित महिलेला वाईट वाटले असेल, तर त्यासाठी मी माफी मागते, असे जोसेफाईन म्हणाल्या. पण या प्रकारावरून सोशल मीडियासोबतच विरोधकांनी देखील मोठे रान उठवल्यानंतर अखेर एम. सी. जोसेफाईन यांनी केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.