मुंबई – देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने विक्रमी घोडदौड कायम राखली असून आज दुपारी 2 वाजेपर्यंत राज्यात तब्बल 3 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अव्वल स्थान कायम राखले आहे. देशात तीन कोटी लसीकरणाचा टप्पा गाठणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.
देशात 3 कोटी लसीकरण पूर्ण करणारे पहिले राज्य ठरले महाराष्ट्र
आज दुपारी दोन वाजेपर्यंत महाराष्ट्रात तब्बल 3 कोटी 27 हजार 217 नागरिकांना लस देण्यात आली आहे. कोरोना लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद करीत ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस दिली होती. एकाच दिवशी एवढ्या संख्येने लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाची विक्रमी कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले होते. त्यानंतर, आज 3 कोटी लशींचे डोस पूर्ण झाले आहेत. दरम्यान, काल 24 जूनपर्यंत झालेल्या लसीकरणात 2 कोटी 97 लाख 23 हजार 951 जणांचे लसीकरण झाल्याची माहिती स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यानंतर, आता महाराष्ट्राने 3 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे.