मुंबई महानगरपालिकेत सहायक आयुक्त, अधिष्ठाता संवर्गासाठी MPSC द्वारे होणार पदभरती


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ व अधिष्ठाता (महापालिका वैद्यक संस्था), गट-अ या संवर्गातील पद भरतीकरीता दिनांक 24 जून, 2021 रोजी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून सदर परीक्षेस अनुसरुन अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 26 जुलै, 2021 असा आहे. ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राबवण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेतील विविध संवर्ग पदावरील पात्र उमेदवारांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सहायक आयुक्त, बृहन्मुंबई, महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, अधिष्ठाता (महापालिका वैद्यक संस्था), गट-अ पदसंख्या- 16 असून एकूण पदांपैकी एक पद कर्णबधीरता अथवा दिव्यांग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये भरती प्रक्रिये संदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे.

अर्ज स्वीकारण्याची पध्दत आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशीलासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेत स्थळाद्वारे उमेदवारांना सर्वसाधारण सूचना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज तसेच माहिती उपलब्ध आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीव्दारे दिनांक 25 जून,2021 ते 26 जुलै, 2021 रोजीपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. सहायक आयुक्त पदासाठी आणि अधिष्ठाता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 719 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर राखीव व अनाथ उमेदवारांना 449 रुपये शुल्क भरावे लागेल.