‘बिग बॉस मराठी ३’ प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार


छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रियालिटी शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ म्हणून ओळखला जातो. १५ एप्रिल २०१८ रोजी ‘बिग बॉस मराठी’चे पहिले पर्व पार पडले. अभिनेत्री मेघा धाडे या पर्वामध्ये विजयी ठरल्यानंतर पर्व संपत नाही तोपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला दुसरं पर्व देखील आले. शिव ठाकरेने यापर्वामध्ये ‘बिग बॉस मराठी 2’ ची ट्रॉफी जिंकली. हे दोन्ही पर्व प्रचंड गाजल्यानंतर आता प्रेक्षक याच्या तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच ‘बिग बॉस मराठी ३’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


कलर्स मराठीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत बिग बॉस मराठी ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस ३. लवकरच कलर्स मराठी ३वर’ असे कॅप्शन दिले आहे.

तसेच ‘बिग बॉस मराठी ३’ संदर्भात अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील एक ट्वीट केले आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये ‘त्यांच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार रहा’ असे म्हटले आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी ३’चे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ३’च्या यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार, घरात कोणते टास्क रंगणार आणि यंदाच्या पर्वात नेमके काय होणार? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे. आता ‘बिग बॉस मराठी ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.