स्वप्निल जोशीच्या समांतर २चा ट्रेलर रिलीज


मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी याची ‘समांतर’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. या वेब सीरिजचे खिळवून ठेवणारे कथानक आणि प्रत्येक रहस्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर आता प्रेक्षक याच्या दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत होते. या सीरिजचा दुसरा सिझन आता १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘समांतर २’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘समांतर’ सीरिजच्या सिझन १ मध्ये कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला, जो आधीच कुमारचे जीवन जगला होता आणि येणाऱ्या काळात काय घडणार आहे, हे तो सांगू शकत होता. चक्रपाणीने कुमारला सिझन २ मध्ये डायरी दिली आहे, ज्यात त्यांच्या आयुष्याचा तपशील आहे. यात कुमारच्या आयुष्यात एक नवीन स्त्री येणार असल्याचे भाकीत आहे. त्यानंतर कुमारचा नशिबाचा शोध सुरु होतो. कुमारचा या डायरीचा अंदाज रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असतानाही त्या स्त्रीचा कुमारच्या आयुष्यात प्रवेश होतो. ही स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला नाशिबाचा सामना करावा लागणार का? याचा शोध १० भागांच्या सीरिजमध्ये आहे.

१ जुलै रोजी ‘समांतर २’ ही वेब सीरिज रिलीज होणार आहे. स्वप्नील जोशी व्यतिरिक्त या सीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, नीतीश भारद्वाज आणि सई ताम्हणकर दिसणार आहेत. ही १० भागांची सीरिज असून ती मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. ही सीरिज प्रेक्षकांना एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

अभिनेता स्वप्निल जोशी ‘समांतर २’ बद्दल म्हणतो, प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षांपलिकडे जाऊन ‘समांतर’ने प्रादेशिक वेब शो अशी ओळख निर्माण केली आहे. भाषेचा अडथळा मोडकळीत काढत, या वेब सिरिजने सर्व भाषिक प्रेक्षकांना आपलेस केले आहे. ‘समांतर’चा पहिला सिझन येऊन आता वर्ष उलटले असून मला माहित आहे की, प्रेक्षक आता सिझन २ची आतुरतेने वाट पाहात आहेत.