मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या आधीचा कोरोना चाचणी घोटाळा ; तीरथ सिंह रावत


डेहरादून – एप्रिल महिन्यात उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पार पडलेल्या कुंभमेळ्यामधील कोरोना चाचण्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले असून कुंभमेळ्यामधील कोरोना चाचण्यांचे कंत्राट एका बनावट कंपनीला देण्यात आल्याचे उघड झाल्यामुळे कुंभमेळा आयोजनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वीची ही घटना असल्याचे विधान कोरोना चाचणीच्या चौकशीच्या घोटाळ्याबाबत केले आहे.

मुख्यमंत्री रावत यांना पत्रकारांनी कोरोना चाचणी अहवालासंदर्भातील कारवाईबाबत प्रश्न विचारले होते. त्यावर त्यांनी ही बाब मी मुख्यमंत्री होण्यापूर्वीची आहे, परंतु यात दोषी आढळणाऱ्यावंर कडक कारवाई केली जाईल. या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून दोषींनाही सोडले जाणार नसल्याचे सांगितले.

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहरादूनचे १५० बेडचे कोविड केअर सेंटर पूर्ण झाले असून मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांच्या हस्ते गुरुवारी त्याचे उद्घाटन झाले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. त्यासाठी प्रत्येक स्तरावर विस्तृत तयारी केली जात आहे. तिसऱ्या लाटेतही या रुग्णालयाची मोठी मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कुंभमेळा कोरोना संकटात पार पडल्यामुळे टीका झाल्यानंतर अजून एक धक्कादायक माहिती समोर आली होती. उत्तराखंड आरोग्य विभागाने हरिद्धारमध्ये कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर करण्यात आलेल्या तपासात एकूण १ लाख चाचणी अहवाल बनावट असून खासगी एजन्सीच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली होती. याप्रकरणी सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.