सोलापूर : सोलापुरात सध्या जगभरात चर्चेत असलेल्या अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग यशस्वी पार पडला आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा प्रयोग करत कोरोनाबाधितांना 24 तासात बरे केल्याचा दावा सोलापूर जिल्ह्यात बार्शीतील डॉ. संजय अंधारे यांनी केला आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे म्हटले जात आहे.
सोलापुरात यशस्वी पार पडला अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग
कोरोनावरील आधुनिक उपचार पद्धतीतील मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा अँटीबॉडी कॉकटेलचा सोलापूर बार्शीतील डॉ. अंधारे यांनी त्यांच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये वापर केला आहे. रुग्णांमध्ये अवघ्या 24 तासांत सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे ते सांगतात. कोरोना संसर्गाच्या आतापर्यंतच्या उपचार पद्धतीमधील सर्वात प्रभावी उपचार पद्धतीने 5 रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी चार रुग्णांवर हे औषध अंत्यत प्रभावी ठरल्याचा दावा संजय अंधारे यांनी केला आहे.
विशेष म्हणजे डॉ. अंधारे यांनी हा प्रयोग डायबिटीज, लठ्ठपणा, हायपर टेन्शन, अशा विविध आजारांसह गंभीर असलेल्या रुग्णांवर केला आहे. या पद्धतीत कसलेही स्टिरॉइड वापर वापरले जात नसल्यामुळे म्युकरमायकोसिस किंवा पोस्ट कोरोनाचा मोठा धोका टाळत असल्याचा दावा देखील डॉक्टरांनी केला आहे. अवघ्या 24 तासांत परिणाम करणाऱ्या या उपचार पद्धतीमुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत आहे. हा प्रयोग बार्शीसारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारे पहिल्यांदाच करण्यात आला आहे. तसेच राज्यातीलही हा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे. इंजेक्शनची किंमत ही 60 हजाराच्या आसपास जरी असली तरी त्रास कमी असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळत आहे.