जागतिक कसोटी अजिंक्यपद विजेत्या संघाला मिळणार एवढे बक्षीस


नवी दिल्ली – : जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी विजेते आणि उपविजेत्यांना किती बक्षीसे देण्यात येणार आहेत याची माहिती आयसीसीने सोमवारी दिली. हा कसोटी सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत बाजी मारणाऱ्या संघाला आयसीसीकडून मानाची गदा देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर, म्हणजेच तब्बल 11 कोटी, 71 लाख, 74 हजार रुपये एवढी रक्कमही बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर, म्हणजेच 5 कोटी 85 लाख 87 हजार रुपये एवढी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. जर हा सामना अनिर्णित राहिला, तर मात्र दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येणार आहे.

जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे इंग्लंडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यावर लक्ष आहे. सहसा येथील स्टेडियममधील खेळपट्टी गोलंदाजांना फायद्याची ठरते. पण, यावेळी मात्र तयार करण्यात आलेल्या खेळपट्टी ही प्रत्येक खेळाडूसाठी तितक्याच फायद्याची असणार आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला जागतिक कसोटी क्रमवारीत आकडेवारीवर नजर टाकल्यास लक्षात येत आहे की, भारतीय संघ 6 मालिका खेळला असून, संघाने 12 सामने जिंकले आहेत. तर, न्यूझीलंडचा संघ 5 मालिका खेळला असून, या संघाने 7 सामने जिंकले आहेत. य़ा गुणतालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ या सामन्यासाठी कोणत्याही सराव सामन्याशिवाय उतरणार आहे. तर, न्यूझीलंडने काही दिवसांपूर्वीच इंग्लंडला त्यांच्याच मायदेशी पराभूत केले होते. तेव्हा आता भारतीय संघ न्यूझीलंडला नमवण्यात यशस्वी ठरतो का, हे आता काही दिवसातच स्पष्ट होईल.